विनय जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 25 डिसेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अमोल कोल्हे यांचं नाव न घेता त्यांना पाडणार असल्याचं अजित पवार म्हणाले. पाच वर्षात एका खासदाराने त्याचा मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केला होता. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होतं. मी बोलणार नव्हतो पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सूचते, कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे, असा टोला लगावतानाच आम्हाला वाटले होते ते उत्तम वक्ते आहेत. संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी उत्तम बजावली होती. पण शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार. तुम्ही काळजीच करू नका. तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. समोर कोणी आहे का? प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे. आता मोदी साहेब पाहिजे का? दुसरे कोणी पाहिजे हे ठरवायचं आहे. मी स्पष्ट बोलणारा आहे. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधान पदासाठी कोणी ही उमेदवार नाही, असं अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं. तसेच वंचित आघाडी स्वबळावर लढणार असल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे त्यावर मी भाष्य करू शकत नाही, असंही ते म्हणाले.
सीव्होटरचा सर्व्हे आला आहे. त्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या सर्व्हेला काही अर्थ नसतो. कुठल्या भागातील हा सर्व्हे झाला आहे ते पाहावं. आम्ही युती केली आहे. आमच्याकडे अजून वेळ आहे आणि वातावरण आमच्याकडे वळेल हे बघू, असं त्यांनी सांगितलं.
अजितदादा यांच्या भाषणाची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी काय भाषण करावे याचा तुम्हाला त्रास होतोय का? माझ्या मतदारांशी काय बोलावे हा माझा प्रश्न आहे. मी मतदाराला आवाहन नाही केले, माझ्या कार्यकर्त्यांशी बोललो आहे, असं ते म्हणाले.
राज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठे कमी आहेत. राज्यात सगळीकडे अशी परिस्थिती आहे. कॅबिनेटमध्ये पाण्याची परिस्थिती सांगितली जाते. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. पिण्यासाठी आधी पाणी द्या, मग शेतीला द्या, अशा सूचना जलसंपदा विभागालाही दिल्या आहेत. पुण्यातही गेल्यावर्षीच्या पाण्याची पातळी कमी आहे. अवकाळी पावसामुळे अनेक फळं आणि पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे सुरू झाले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना दिली.