UPSC कडून गुन्हा दाखल होताच पूजा खेडकर नॉट रिचेबल; फोन, व्हॉट्सॲपही बंद
पुणे पोलिसांकडूनही पूजाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तिचा फोन नॉट रिचेबल असल्याचे समोर आले. त्यामुळे चौकशीपूर्वीच पूजा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर येत आहे.
IAS Pooja Khedkar Case Update : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आयएएस अधिकारी बनण्यासाठी खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप झालेल्या पूजा खेडकर या आता नॉट रिचेबल झाल्या आहेत. पूजा खेडकर यांना उत्तराखंडमधील मसुरी या ठिकाणी असलेल्या प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पूजा खेडकर यांना मंगळवारपर्यंत चौकशीसाठी येण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या चौकशीआधीच पूजा खेडकर गायब झाल्याचं बोललं जात आहे.
पूजा खेडकर यांच्याविरोधात युपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना परीक्षा देण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच तुमची उमेदवारी रद्द का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस देखील त्यांना पाठवण्यात आली आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर यांना मंगळवारी २३ जुलैपर्यंत उत्तराखंडमधील मसुरी या ठिकाणी असलेल्या प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र त्या या चौकशीसाठी पोहोचल्याच नाहीत. तसेच त्यांनी याबद्दल कोणतेही पत्र दिलेले नाही.
पूजा खेडकरचा फोन ‘नॉट रिचेबल’
पुणे पोलिसांकडूनही पूजाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तिचा फोन नॉट रिचेबल असल्याचे समोर आले. त्यामुळे चौकशीपूर्वीच पूजा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. पूजा खेडकरने विविध मुलाखतीत तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे म्हटले होते. माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असून त्याआधारे मी आरक्षणाचा लाभ घेत आहे, असा दावा तिने केला आहे.
आई-वडिलांच्या घटस्फोटाचा बनाव रचला का?
मात्र दिलीप खेडकर यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच्या प्रतिज्ञापत्रात मनोरमा खेडकरांचा पत्नी म्हणून उल्लेख आहे. खेडकर कुटुंबियांच्या मालमत्तांचा ताबा दिलीप खेडकर, मनोरमा खेडकरांकडे संयुक्तपणे असल्याचं समोर आलं. त्यामुळे पूजा खेडकरांनी फक्त यूपीएससी परीक्षेमध्ये फायदा व्हावा यासाठी मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांनी घटस्फोटाचा बनाव रचला का? याची चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत.
एकीकडे वादात सापडलेल्या पूजा खेडकर चौकशीआधीच नॉट रिचेबल झाल्या. तर दुसरीकडे त्यांच्या आईवडिलांच्या घटस्फोटाची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्यामुळे खेडकर कुटुंबही अडचणीत सापडले आहे. त्यामुळे आता याप्रकरणी अजून कोणती नवीन माहिती समोर येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.