अभिजित पोते, पुणे : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु असताना राष्ट्रीय तपास संस्था पुणे शहरात दाखल झाल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि इंटेलिजेन्स ब्यूरो (आयबी) यांच्यांकडून पुणे शहरात कारवाई सुरु झाली आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. ही कारवाई कशामुळे केली गेली आहे? याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. परंतु पुण्यातून एका जणाला ताब्यात घेतले आहे. परंतु ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन ही कारवाई झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे शहरातील कोंढवा परिसरात एनआयए आणि आयबीची छापेमारी सुरु केली आहे. या तपास संस्थांचे पथक सोमवारी पहाटेच सकाळीच कोंढव्यात पोहचले. त्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये छापेमारी केली. या ठिकाणावरुन जुबेर शेख (वय ३९ वर्ष) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अन् आयबी यांनी संयुक्तरित्या कारवाई करत काही कागदपत्रे जप्त केले आहे. ही कारवाई कशामुळे झाली ही माहिती मिळू शकली नाही.
देशात दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी आयबी काम करते. पुणे येथील जुबेर शेख याच्यासंदर्भात मिळालेल्या माहितीनंतर आयबीने राष्ट्रीय तपास संस्थेला माहिती दिली. त्यानंतर दोन्ही संस्थांनी मिळून ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान पुणे पोलिसांनाही सोबत घेण्यात आले होते. आता जुबेर शेख याचे कोणाशी कनेक्शन होते? तो इसिसच्या कोणाच्या संपर्कात होता, ही माहिती चौकशी केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. परंतु या प्रकारामुळे पुणे शहरात खळबळ माजली आहे.