इंदुरीकर महाराज यांची मराठा आंदोलनात उडी, घेतला आजवरचा सर्वात मोठा निर्णय ; आता पाच दिवस…
मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्यातील मराठा समाज अधिकच आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलकांनी गावागावात उपोषणं सुरू केली आहे. पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत नेत्यांना गावात प्रवेश दिला जाणार नसल्याचा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी...
मनोज गाडेकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नगर | 29 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षण आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह गावागावातील मराठा समाजाने उपोषण सुरू केलं आहे. नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. नेत्यांची वाहने अडवली जात आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. कँडल मार्च निघत आहेत. सार्वजनिक वाहने फोडली जात आहेत. रास्ता रोकोही केला जात आहे. मराठ आंदोलन उग्र होत असतानाच आता यात प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज (इंदूरीकर) यांनी उडी घेतली आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा देतानाच इंदुरीकर महाराज यांनी आजवरचा सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे.
निवृत्ती महाराज (इंदूरीकर) यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. इंदुरीकर महाराज यांनी उद्यापासून 5 दिवस कोणतेही कार्यक्रम न करण्याचा आणि कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून इंदुरीकर महाराज यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांचे उद्यापासून ते पाच दिवसापर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द झाले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, इंदुरीकर महाराज हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जालन्याला जाणार की नाही याबाबतची माहिती कळू शकलेली नाही.
प्रतिकात्मक अंत्ययात्रा
दरम्यान, नगर जिल्ह्यातही मराठा आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. संगमनेर तालुक्यातील साकूर पठारभागातील सकल मराठा समाजाने सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा बिरेवाडी गावठाणातील स्मशानभूमीत नेत हिंदू रुढीपरंपरेनुसार अंत्ययात्रेचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात पठारभागातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थितीत होता.
विखे पाटील यांचा दौरा रद्द
अहमदनगरला मराठा आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर दौरा रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. अहमदनगर शहरातील एनआर लॉन्स येथे प्राथमिक शिक्षक संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार होते.
मात्र मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द करावा लागला आहे. मराठा आंदोलक सभा उधळून लावणार असल्याची शक्यता होती. त्यातच काही आंदोलकांनी सभेत घुसून फलकावर असलेले मंत्र्यांचे फोटो काढायला लावला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत सरकारचा निषेध केलाय.