पुणे : आळंदी पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करत लाखोंचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात. पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर पोलीस आयुक्तालयातील आळंदी परिसरात कंपनीमध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीचा आळंदी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नयसिंग लालसिंग ग्रेली, निट बहुमसिंग ढमाई, विशाल शेटे, दिनेश नयसिंग ढोली, लक्ष्मण ग्रजु दमाई, नैनसी खडकमी ढोली अशी आरोपींची नावे असून त्यांना आळंदी पोलिसांनी (Alandi Police) बेड्या ठोकल्या आहेत तर अन्य एक अल्पवयीन मुलाचा ही यात समावेश आहे. तर ह्याच टोळीकडून म्हाळुंगे, चाकण आणि आळंदी ठाणे हद्दीतील अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात आळंदी पोलिसांना यश आले आहे.
आरोपींकडून लॅपटॉप, कॉपर केबल, तांब्याची भांडी, कंपणीमधील इतर वस्तू असा एकूण 6 लाख 27 हजार 875 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विद्या माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी संगनमत करून एकत्र येत असत. कंपन्या अगोदरच्या दिवशी फिक्स करत असत आणि तिथे ते चोरी करत होते. गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली. त्यानुसार भर पावसामध्ये रात्रभर आम्ही सापळा लावला होता. यावेळी आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांना पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल साडे सहा ते सात लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे माने यांनी सांगितले.
आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आले आहेत. यातील सहा आरोपी नेपाळचे आहेत. आळंदी पोलीस स्टेशन, चाकण पोलीस स्टेशन, महाळुंगे पोलीस चौकी याअंतर्गत जे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, त्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यात आणखीही आरोपी असण्याची शक्यता आहे. सुरुवातीला पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्या टोळीच्या म्होरक्याला ताब्यात घेतले आहे. आता आणखी तपास करून इतर आरोपींनाही लवकरच ताब्यात घेऊ, अशी माहिती देण्यात आली आहे.