दोन्ही ठाकरे एकत्र येणार का? यावर राज ठाकरे यांचं स्पष्ट शब्दांत उत्तर

| Updated on: Jul 04, 2023 | 7:04 PM

राजकारणात काहीही होऊ शकतं, असं बोलतात. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात असलेले ठाकरे बंधू आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येणार का? असा प्रश्न वारंवार चर्चिला जातो. विशेष म्हणजे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

दोन्ही ठाकरे एकत्र येणार का? यावर राज ठाकरे यांचं स्पष्ट शब्दांत उत्तर
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येतील का? असा प्रश्न सारखा चर्चेत येतो. अर्थात या चर्चा सुरु होण्यामागे देखील काही ठरावीक कारणं आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रभावशाली व्यक्तीमत्व आहेत. ते त्यांच्या धडाकेबाज स्वभाव आणि भाषण शैलीमुळे राज्यातील लाखो तरुणांच्या मनात आहेत. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या वाईट राजकीय परिस्थितीतून जात आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांचे भाऊ आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून त्यांना राजकारणाचे धडे मिळाले. पण गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्ही भावांमध्ये दुरावा आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे घडतंय त्याची कधीच कुणी कल्पना केली नसेल असं घडतंय. खरंतर या घडामोडींना 2019 च्या विधानसभा निवडणुकींनंतरच सुरुवात झाली होती. भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत मैत्री केली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण हे सरकार अडीच वर्षांनी कोसळलं. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारतं शिवसेना पक्षात मोठी फूट पाडली.

निवडणूक आयोगाकडून शिंदे यांनाच शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष निर्माण केला, आज त्यांच्याच चिरंजीवांना त्या पक्षाचं नाव वापरता येत नाहीय. त्यामुळे या कठीण काळात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मदत करावी, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे. पण तरीही दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसले नाहीत. याउलट ते एकमेकांविरोधात टीका करताना दिसले.

हे सुद्धा वाचा

मविआचं सत्ता गेल्यानंतर आता वर्षभराचा काळ उलटलाय आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे देखील सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे विरोधात आणि सरकारमध्ये कोण आहे? हेच कळत नाहीय, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे. अशा परिस्थितीत दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी चर्चा रंगू लागली आहे. याशिवाय त्याची महाराष्ट्राला गरज आहे, अशी चर्चा सुरु आहे.

विशेष म्हणजे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीतही मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असा सूर मनसे नेत्यांमध्ये दिसला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आज स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार का? या प्रश्नाचं उत्तर दिलं.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“आमच्या बैठकीत अशी कुठलीही मागणी झाली नाही. आता या सगळ्या गोष्टींवर तुम्ही ठाम असाल तर हे असंच वागतील, नाही का? तुम्ही पत्रकार असं बोलायला लागलात तर या लोकांना हे सर्व हवंत आहे. मला असं वाटतं तुम्ही कुठेतरी ठाम राहणं गरजेचं आहे”, अशी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांनी मूळ प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.

राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यासाठी याआधीदेखील साद?

काही दिवसांपूर्वी ‘झी मराठी’च्या ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी राज ठाकरे यांना याबाबतचा प्रश्न विचारला असता आपण उद्धव ठाकरे यांना राजकारणात एकत्र येण्यासाठी साद घालण्याचा प्रयत्न केला. पण उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे जेव्हा आजारी पडले होते तेव्हा राज ठाकरे त्यांच्या भेटीसाठी गेले होते. उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या गाडी चालवली होती. संबंधित प्रसंगाची वारंवार महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होते.