पुणे | 14 ऑक्टोंबर 2023 : सरकारी नोकरी तरुणांचे आकर्षण असते. या नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात. काही जण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यात यश मिळवतात. परंतु काही जण शार्ट मार्गाच्या फेऱ्यात अडकतात. भारतीय लष्कारात दाखल होण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. हे स्वप्न पाहणाऱ्या 42 युवकांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक तब्बल एक कोटी 80 लाखांमध्ये झाली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्या आरोपीवर फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सदर्न कमांडचा लायझन युनिटने हा प्रकार उघडकीस आणला.
सांगली जिल्ह्यातील तासगावमधील पांडुरंग कराळे याने अनेकांची फसवणूक केली. हा प्रकार त्याने फेब्रवारी 2022 ते 15 सप्टेंबर 2023 पर्यंत केला. महेश ढाके हे फेब्रवारी महिन्यात कामासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी कोंढवा येथे त्यांची पांडुरंग कराळे याच्याशी भेट झाली. पांडुरंग कराळे याने आपली लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगितले. मग ढाके यांनी तुम्ही आर्मीसाठी भरती करतात का? असे विचारले. त्यावेळी त्याने आपण अधिकाऱ्यांना सांगून अशी अनेकांची कामे केल्याचे सांगितले.
दोन दिवसांनी महेश ढाके यांना कराळे यांचा फोन आला. टिरिटोरिअल आर्मीत भरती होणार आहे. कोण असेल तर सांगा? तसेच एका उमेदवारासाठी सहा लाख लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ढाके यांनी मित्रांना आणि नातेवाईकांना हा विषय सांगितला. एक, एक करत 42 उमेदवार ढाके यांनी कराळे यांना दिले. त्यांच्याकडून एक कोटी 80 लाख रुपये त्यांनी घेतले.
ढाके यांनी कराळे यांनी सांगितल्यानुसार बेळगाव येथे मुलांना नेले. त्याठिकाणी त्या मुलांची कागदपत्रे तपासली गेली. फिटनेस चाचणीही करण्यात आली. लेखी परीक्षेसाठी हॉल तिकीट दिले. परंतु परीक्षांची तारीख वारंवार बदलत गेली. मग ढाके यांनी परीक्षेची तारीख नक्की सांगा नाही तर पैसे परत द्या, असे सुनावले. परंतु या गोष्टी झाल्या नाही. यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली. त्याच्या फिर्यादीनंतर सदर्न कमांडने एक डमी उमेदवार पाठवून हा प्रकार उघड केला. या प्रकरणा पांडुरंग कराळे याला अटक करण्यात आली आहे.