Pune traffic : विद्यापीठ चौकातली वाहतूक कोंडी सुटणार, पीएमआरडीए आणि महापालिकेचं संयुक्त प्रेझेंटेशन, वाचा…
आयआयटी बॉम्बेच्या मदतीने ट्रॅफिक सर्क्यूलेशन करण्यात आले आहे, त्यानुसार पर्यायी रस्त्यांचा वापर केला जाणार आहे. येथील ट्रॅफिक ही चार वेगवेगळ्या लेव्हलला असणार आहे.
अभिजीत पोते, पुणे : पुण्यातील विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. पीएमआरडीए आणि पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) संयुक्तपणे यासंबंधीचे प्रेझेंटेशन केले. मेट्रोसह विद्यापीठ चौकात उड्डाणपूल होणार आहे. विद्यापीठ चौकात शहरातील सर्व मुख्य रस्ते मिळत असल्याने याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी सध्या होत आहे. विद्यापीठ चौकात फ्लायओव्हर होणार आहे. तर त्याच्याही वरून मेट्रो धावणार आहे. विद्यापीठ चौकात (SPPU) चार मजली उड्डाणपूल बनणार आहे. सप्टेंबर 2022पासून येथील प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात आहे. तर नोव्हेंबर 2024पर्यंत कामाची पूर्तता होणार आहे. पीएमआरडीएचे (PMRDA) अभियंता विवेक खरवडकर यांनी याविषयीची सविस्तर माहिती दिली. बाणेर, औंध, पाषाणकडे जाणारी वाहतूक यामुळे सुरळीत होणार आहे. आयआयटी बॉम्बेची मदत याकामी घेतली जाणार आहे.
सप्टेंबरपासून या कामाला सुरुवात
विवेक खटावकर म्हणाले, की विद्यापीठ चौक हा शहरातील एक महत्त्वाचा चौक आहे. सर्व महत्त्वाचे रस्ते येथून जातात. याठिकाणी सतत वाहतूककोंडी होत असते. मेट्रोचे काम याठिकाणी सुरू आहे. यावर उपाय म्हणून विद्यापीठ चौकात उड्डाणपूल बांधणे आणि त्याच्यावर मेट्रो करणे असा हा प्रकल्प आहे. प्रत्यक्ष डिझायनिंग आणि कामाची पूर्तता पूर्ण होत आलेली आहे. सप्टेंबरपासून या कामाला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर 2024पर्यंत हे पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.
वाहतूक परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात होणार सुधारणा
या कामामुळे येथील वाहतूक परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात सुधारणा होणार आहे. बाणेर रोड, औंध रोड, पाषाण रोड, सेनापती बापट रोड आणि रेंज हिल कॉर्नरचा रोड असे रस्ते याठिकाणी मिळतात. या सर्व ठिकाणांवरची वाहतूक सुलभ व्हावी याचे नियोजन करण्यात येत आहे. बॅरिकेडिंगमुळे वाहतुकीला अधिक समस्या येवू शकते. याकरिता ते टप्प्याटप्प्याने करण्याचेही नियोजन आहे.
चार वेगवेगळ्या लेव्हलला ट्रॅफिक
आयआयटी बॉम्बेच्या मदतीने ट्रॅफिक सर्क्यूलेशन करण्यात आले आहे, त्यानुसार पर्यायी रस्त्यांचा वापर केला जाणार आहे. येथील ट्रॅफिक ही चार वेगवेगळ्या लेव्हलला असणार आहे. अंडरपास, अॅटग्रेड, फर्स्ट लेव्हल म्हणजे फ्लायओव्हर आणि नंतर मेट्रोची लेव्हल अशी असणार आहे, असे विवेक खटावकर यांनी माहिती दिली आहे.