कोल्हापूर | 20 सप्टेंबर 2023 : सबसे कातिल गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांची क्रेझ अजूनही संपलेली नाही. गौतमी पाटील म्हणजे गर्दी, गौतमी पाटील म्हणजे पैसा वसूल, गौतमी पाटील म्हणजे टाळ्या शिट्ट्या आणि गौतमी पाटील म्हणजे राडा हे समीकरण जणू ठरलेलं आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी गौतमीचा कार्यक्रम झाला, त्या त्या ठिकाणी हा राडा पाहायला मिळाला आहे. असं असूनही गौतमीचे कार्यक्रम हाऊस फुल्ल असतात. तिच्या तारखा मिळणं मुश्किल होतं. कोल्हापूरकरांना कशा तरी तिच्या तारखा मिळाल्या होत्या. पण पोलिसांनी तिचे कार्यक्रम तडकाफडकी रद्द केला आहे. त्यामुळे गौतमीसह तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
गणेशोत्सव काळात कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले गौतमी पाटीलचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मनोरंजन विभाग आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्याने गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सव काळातील पोलिसांवर असलेला अतिरिक्त ताण लक्षात घेता कार्यक्रमासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देता येणार नसल्याचे कारण पोलिसांनी दिलंय. त्यामुळे गौतमीचे 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूरच्या ग्रामीण भागात होणारे हे कार्यक्रम आता होणार नाही. या कार्यक्रमांना परवानगीच नाकारल्याची माहिती आता कोल्हापूरच्या अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.
गणेशोत्सव आहे. सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे आमच्यावर अतिरिक्त ताण आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. त्यामुळे उत्सव काळात उत्सवाखेरीज इतर कुठेही पोलीस बंदोबस्त देणं शक्य नाही, असं कारण पोलिसांनी दिलं आहे. त्यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना आता कोल्हापूरकरांना मुकावं लागणार आहे.
सणासुदीच्या काळात गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना मोठी मागणी असते. तिच्या कार्यक्रमाला गर्दी होत असल्याने आयोजक गौतमीला आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, गावात बोलावण्यावर भर देत असतात. पण सणासुदीत पोलिसांकडे बंदोबस्तांचं काम असतं. त्यामुळे पोलीस कोणत्याही इतर कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे गाण्याच्या आणि स्टेज कार्यक्रमांना पोलीस बंदोबस्त पुरवला जात नाही. गौतमी पाटील हिलाही याच कारणाचा फटका बसला आहे. त्यामुळे ऐन कमाईच्या काळात गौतमी पाटीलसह अनेक कलाकारांना फटका बसत आहे.