पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रीय, कोयता हातात घेऊन पसरवली दहशत
Pune Crime News : पुणे शहरातील कोयता गँगची दहशत कमी होत नाही. कोयता गँग पुन्हा पुन्हा सक्रीय होत आहे. या कोयता गँगपुढे पोलिसांच्या उपाययोजनाही अपूर्ण पडत आहे. आता पुण्यात पुन्हा कोयता गँगने धुमाकुळ घातला आहे.
पुणे : कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांच्या (Crime News) धडक कारवाया सुरु आहेत. या गँगचा म्होरक्यासह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. काही जणांवर मकोका लावण्यात आला आहे. काही जणांना हद्दपार करण्यात आले आहे. कोयताची विक्री करताना आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. या सर्व उपायानंतरही कोयता गँगने डोके वर काढले आहे. त्यांची अजूनही शहरात दहशत आहे. पुणे शहरातील हल्ले कमी होत नाही. कोयता गँगचा धुमाकूळ आता पुन्हा सुरु झाला आहे. येरवडा भागात कोयता गँगने दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय.
काय केले कोयता गँगने
पुण्यातील येरवडा भागात कोयता हातात घेत आरोपींकडून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला. येरवड्यातील गांधी नगरमध्ये ही घटना घडली. कोयता अन् शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा आरोपींनी प्रयत्न केला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने फिर्यादीला गंभीर जखमी केले. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे.
पाच लाखांची केली लूट
दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी टेम्पोचालकावर कोयत्याने वार करत साडेपाच लाखांची लूट केल्याची घटना तुळापूर येथील इंद्रायणी नदीवरील पुलाजवळ दोन दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. इंद्रायणी पुलाजवळून रियाज चाँदभाई मुलाणी (वय ४१, रा. वाडेबोल्हाई, वाडेगाव) जात असताना दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी टेम्पोला दुचाकी आडवी लावली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना मारहाण करुन दंडावर कोयत्याने वार करत जखमी केले. तसेच, त्यांच्या खिशातील साडेपाच लाख रुपये आणि मोबाईल लंपास केला.