Lalit Patil : अखेर ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक; ससूनमधून फरार झाला, बंगळुरूत सापडला
भाऊ भूषण पाटील याला अटक केल्यानंतर अखेर ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. त्याला बंगळुरूतून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्या शोधासाठी एकूण दहा पथके तैनात करण्यात आली होती.
योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 18 ऑक्टोबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील हा बंगळुरू येथे लपून बसला होता. त्याच्या शोधासाठी दहा पथकं तयार करण्यात आली होती. अखेर रात्री त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ललित पाटीलला आता पुण्यात आणलं जाणार आहे. त्यानंतर त्याला कोर्टात सादर केलं जाईल. ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्सप्रकरणातील अनेक बड्या धेंडांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे.
ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला अटक करण्यात आली होती. तर ललित पाटील हा ससूनमधून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 10 पथके तयार करण्यात आली होती. गेल्या 15 दिवसांपासून ललित फरार होता. अखेर तो बंगळुरूत असल्याची टिप मिळाली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून ललितच्या रात्रीच मुसक्या आवळल्या. त्याला आता पुण्यात आणलं जाणार असून कोर्टात सादर करण्यात येणार आहे.
गावात जाऊन झाडाझडती
दरम्यान, ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलला पुणे पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्याला तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटील याच्या घरी पुणे पोलिसांनी तपास केला. शिंदे गावात ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, त्या ड्रग्स कारखान्यावर देखील भूषणला तपासासाठी नेण्यात आले होते. ही चौकशी पूर्ण करून पुणे पोलिसांचे पथक भूषण पाटीलला घेऊन रवाना झाले. दरम्यान या तपासाप्रकरणी पुणे पोलिसांसह नाशिक पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
एक पोलीस आमच्या घरी आला होता. पोलीस आणि राजकारणी मिळून तुमच्या मुलाचा एन्काऊंटर करणार असल्याचं त्याने आम्हाला सांगितलं. पोलीस आमच्या घरी येऊन तपास करत आहेत. आमच्या घरी सोनं वगैरे काही सापडलं नाही. घरात फक्त माझं मंगळसूत्र आहे. सध्या ललित कुठे आहे हे आम्हाला माहीत नाही. अभिषेकला मी ओळखत नाही. एकदोनवेळेस तो घरी आला होता. पोलीस ललितचा एन्काऊंटर करणार असल्याची आम्हाला भीती आहे, अशी प्रतिक्रिया ललितच्या आईने दिली होती.
बड्या धेंडांची पोलखोल होणार?
ललित पाटील याला ससून रुग्णालयात सर्व सुविधा पुरवल्या जात असल्याचं उघड झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आरोपांची राळही उठली होती. राजकीय पक्षांनी या प्रकरणावरून एकमेकांना टार्गेट केलं होतं. ड्रग्स माफिया असलेल्या ललितला कोण सुविधा पुरवत होतं? रुग्णालयातून तो ड्रग्सचं रॅकेट कसं चालवत होता? त्याच्यामागे कुणाकुणाचं पाठबळ होतं? याचा उलगडा आता होणार असल्याचं सांगितलं जात आहे.