अखेर ललित पाटील प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल सादर, अहवालात कोणावर ठपका?
Lalit Patil Drug Case | ललित पाटील प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला. पंधरा दिवसांची दिलेली मुदत संपल्यानंतर हा अहवाल आला आहे. या गोपणीय अहवालात काय आहे आणि शासनाकडून आता काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे.
प्रदीप कापसे, पुणे | 28 ऑक्टोंबर 2023 : ससून रुग्णालयात दाखल असलेला आरोपी ललित पाटील याच्यावर उपचाराच्या नावाखाली महिनोंनमहिने बडदास्त ठेवली होती. तो फरार झाल्यानंतर यासंदर्भात एक-एक धक्कादायक माहिती समोर आली. या माहितीनंतर राज्य शासनाने ससून रुग्णालयासंदर्भात चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या प्रकरणी नेमलेल्या समितीला चौकशी करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल सादर झाला आहे. या अहवालात काय आहे, त्यासंदर्भात गोपनीयता पाळण्यात येत आहे.
काय आहे समितीच्या अहवालात
ससून रुग्णालयातील कारभाराची चौकशी करण्यासाठी शासनाने वैद्यकीय शिक्षण संचालक डॅा. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केली होती. या समितीमध्ये डॉ. सुधीर देशमुख, डॉ. हेमंत गोडबोले, डॉ. एकनाथ पवार यांचा समावेश होता. या समितीला चौकशी करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. या मुदतीत समितीचा अहवाल आला नाही. यामुळे पुन्हा समितीला आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. अखेर या समितीने आपला अहवाल दिला आहे. समितीचे अध्यक्ष आणि संचालक डॉ म्हैसेकर यांनी शासनाला हा गोपनीय अहवाल दिला आहे. अहवालात नेमके कोणावर ठपका ठेवण्यात आला आहे? या बाबत प्रचंड गुप्तता आहे.
एकाच दिवसांत नोंदवले ८० जणांचे जबाब
चौकशी समितीने एकाच दिवासांत तब्बल ८० जणांचे जबाब नोंदवून घाईने अहवाल सादर केला. आता या अहवालात काय शिफारशी केल्या आहेत? हे सांगण्यास डॉक्टर म्हैसेकर यांनी नकार दिला. दरम्यान या प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. मुंबईतून ताब्यात घेतलेल्या रेहान अन्सारी याच्या तपासात इम्रान खान याचे नाव समोर आले आहे. इम्रान खान हा आधीच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी २ पथके पाठवली आहेत. इम्रान खानच नाव येत असल्याने तपासासाठी पुणे पोलिसांनी रेहानची कोठडी मागितली होती. त्यानंतर रेहान याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.