Lalit Patil | कारागृहात भेट झाली…35 लाखांचा सौदा अन् सुरु झाला ड्रग्स कारखाना
Pune Lalit Patil | ललित पाटील याचा ड्रग्सचा कारखाना कसा सुरु झाला? त्याला मदत करणारे कोण आहेत? केवळ 35 लाख देऊन ललित पाटील याने कसा सुरु केला ड्रग्सचा व्यापार ही सर्व माहिती पोलिसांच्या तपासातून बाहेर आली आहे.
अभिजित पोते, पुणे | 22 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील येरवडा कारागृहातील कैदी आणि ड्रग्स तस्कर ललित पाटील प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. येरवडा कारागृहात असलेला ललित पाटील याचा ड्रग्स कारखाना उभारण्याचा प्लॅन कारागृहातच घडला. ३५ लाख रुपये देऊन त्याने त्याने ड्रग्स कसे बनवावे? हे शिकून घेतले. त्यानंतर नाशिकला कारखाना सुरु करुन राज्यात अन् देशात ड्रग्सचा व्यवसाय सुरु केला. त्यातून गडगंज कमाई त्याने केली. त्याला ड्रग्सचा फार्मूला देणारा व्यक्ती केमिकल इंजिनिअर आहे. आता पुणे पोलिसांनी कारागृहातून त्याचा ताबा घेतला आहे.
कोण आहे ललित पाटील याला फार्मूला देणारा
ड्रग्स तस्कर ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील या दोघांना एमडी ड्रग्स म्हणजेच मेफेड्रोनचा फॉर्मूला देणारा अरविंद लोहारे आहे. तो केमिकल इंजिनिअर आहे. मेफेड्रोन ड्रग्स कसे तयार करायचे हे त्याने कारागृहात ललित पाटील याला सांगितले. त्यासाठी त्याला ललित पाटील याने ३५ लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. लोहारे याच्यावर नाशिक आणि इगतपुरी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
हरीश पंत भेटला अन् सुरु झाला कारखाना
कैदी असलेला अरविंद लोहारे याच्या सांगण्यावरून हरीश पंत याने भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांची भेट घेतली. त्यानंतर शिवाजी शिंदे, राहुल पंडित आणि इतर साथीदारांच्या मदतीने त्यांनी कारखाना सुरु केला. नाशिकमधील शिंदे गावात मेफेड्रोन तयार करण्याची कारखाना त्यांनी सुरु केला. अरविंद लोहारे हा केमिकल इंजिनियर आहे. तो चाकण येथील ड्रग्स प्रकरणात २०२० पासून येरवडा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.
अनेकांना दिला फार्मूला
अरविंद लोहारे याने ड्रग्स बनवण्याचा फार्मूला अनेकांना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुणे पोलिसांनी रविवारी येरवडा कारागृहातून त्याचा ताबा घेतला. त्याला न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे. त्यानंतर लोहारे याने ललित पाटील याच्यासह कोणाला एमडी ड्रग्स बनवण्याचा फार्मूला दिला, ते समोर येण्याची शक्यता आहे.