२ कोटी रुपये मिळवण्यासाठी जिवंत माणूस झाला मृत, असा झाला बनाव उघड
fraud cases : जिवंत व्यक्तीला मृत दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही फसवणूक तब्बल २ कोटी रुपयांमध्ये झाली आहे. तब्बल सहा वर्षांच्या चौकशीनंतर हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पुणे : सनदशील मार्गाने पैसे कमवण्यापेक्षा गैरमार्गाने पैसा मिळवण्याचे प्रकार सध्या वाढत आहे. मग पैशांसाठी काहीही करण्यास लोक तयार होतात. नुकताच असाच एक प्रकार उघड झाला. त्यानुसार पैशांसाठी जिवंत व्यक्तीला मृत दाखवण्यात आले. मग त्याला २ कोटी रुपये मिळाले. परंतु हा सर्व बनाव असल्याचे सहा वर्षांच्या चौकशीनंतर स्पष्ट झाले. यानंतर या प्रकरणी त्या मृत असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला अटक झाली होती. आता या प्रकरणी त्याला मदत करणाऱ्यास अटक झाली आहे.
काय आहे प्रकार
भारतीय जीवन विमा निगमकडून जिवंत व्यक्ती मृत दाखवून २ कोटी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे-नगर महामार्गावर गव्हाणेवाडी शिवारात झालेल्या अपघातात मृत झाल्याचा बनवा करत हे पैसे एलआयसीकडून मिळवले होते. दिनेश प्रमोद टाकसाळे याने हा प्रकार केला होता. त्याला यापूर्वीच अटक झाली होती. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे (मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) यांना अटक केली. या प्रकरणात दिनेश प्रमोद टाकसाळे, त्याचे सहकारी अनिल भीमराव लटके, विजय रामदास माळवदे (सर्व रा. केडगाव) यांना अटक केली.
मुंबई एलआयसीची झाली फसवणूक
केडगाव येथील दिनेश टाकसाळे याने सन २०१५ मध्ये एलआयसीच्या दादर येथील शाखेकडून २ कोटींचा विमा घेतला होता. या विम्यासाठी दोन वर्षे विम्याचे वार्षिक हप्ते भरले. दरम्यान, नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदे) शिवारात २५ डिसेंबर २०१६ रोजी एक अपघात झाला होता. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तो मृतदेह दिनेश टाकसाळे याचा असल्याचा दावा करण्यात आला. त्यासाठी श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक विशाल केवारे यांनी बनावट मृत्यू दाखला दिला. त्यानंतर दिनेशचा अपघाती मृत्यू झाल्याची कागदपत्रे एलआयसीला १४ मार्च २०१७ रोजी सादर केली. मग दिनेशच्या आई-वडिलांनी दोन कोटींचा विमा ‘एलआयसी’कडून मंजूरही करण्यात आला.
एलआयसीने सुरु केली चौकशी
भारतीय जीवन विमा निगमला या प्रकरणी संशय आला. मग त्यांनी चौकशी सुरु केली. सहा वर्षे चौकशी केल्यानंतर दिनेश टाकसाळे जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणी मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात २१ फेब्रुवारी २०२३ रोजी फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला दिनेश टाकसाळे, अनिल लटके, विजय माळवदे यांना अटक केली. त्यानंतर बोगस मृत्यू दाखला देण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरुन विशाल केवारे यास अटक केली. केवारे हे सातत्याने अनिल लटके याच्याशी फोनवरुन संपर्कात होते, हे कॉल रेकॉर्डवरुन स्पष्ट झाले आहे.
मग तो मृतदेह कोणाचा
पुणे-नगर महामार्गावर झालेल्या अपघातातील दिनेश जिवंत आहे. मात्र, तो मृतदेह कोणाचा होता. हे संपूर्ण प्रकरण अजून उघड झालेले नाही. हा खरंच अपघात होता, की एखाद्याचा अपघात घडवून आणला, याचा उलगडा पोलीस तपासानंतर होणार आहे.