‘महाराष्ट्र भटकत्या आत्म्यांचा शिकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात’; निशाणा देशातील सर्वात मोठ्या नेत्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय अस्थिरतेवर भाष्य करताना नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र हा भटकती आत्म्यांचा शिकार बनलाय, असं म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि पुणे जिल्ह्यातील महायुतीचे इतर उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अतिशय खोचक शब्दांमध्ये विरोधकांवर निशाणा साधला. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय. या आत्मा स्वत:चं काम पूर्ण झालं नाही तर इतरांचं देखील काम बिघडवतात, अशी टीका नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केली.
“महाराष्ट्राने खूप काळ राजकीय अस्थिरता पाहिली आहे. मी आज काही सांगण्याआधी स्पष्ट करु इच्छितो की, कुणीही आपल्या डोक्यावर टोपी घेऊ नका. आमच्याइकडे म्हणतात की, काही भटकणाऱ्या आत्मा असतात, ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले असतात, अशा आत्मा भटकत असतात. मग स्वत:चं काम झालं नाही तर इतरांचं काम बिघडवण्यातही त्यांना मजा येते. आमचा महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
‘इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी…’
“आजपासून 45 वर्षांपू्र्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एक अस्थिरतेच्या मार्गावर गेलं. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. विपक्ष सरकार अस्थिर करत नाहीत. तर या आत्माच काहीतरी करतात. ते आपल्या पक्षातही असंच काहीसं करतात. या आत्मा कुटुंबातही तसंच करतात”, असा घणाघात शरद पवारांनी केला.
“1995 मध्ये जेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार आलं तेव्हाही या आत्म्याने ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. 2019 मध्ये या आत्माने जनादेशाचा अपमान केला. ते महाराष्ट्राची जनता जाणते. विशेष म्हणजे आज देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज भारताला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचवून देशाला स्थिर, मजबूत सरकारची आवश्यकता आहे”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. महाराष्ट्रात आमची महायुती आहे, ती मजबुतीने इतकी पुढे जावी की, गेल्या 35 ते 40 वर्षात ज्या कमतरता राहिल्या आहेत, त्या पूर्ण भरुन काढतील, आणि विकसित भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं काम होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.