लोणावळा येथील दुर्घटनेत अन्सारी कुटुंबातील 10 जण पाण्यात वाहून गेले होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण वाचले आहेत. या दुर्घटनेत एका लहान मुलीच्या हृदयाचे ठोकेच बंद पडले होते. तिचा श्वास कोंडला गेला होता. पण तेवढ्यात या परिसरात फिरायला आलेले दोन डॉक्टर देवासारखे धावून आले. त्यांनी या मुलीला सीपीआर दिला. त्यामुळे तिच्या हृदयाचे ठोके सुरू झाले. मुलगी वाचली. जर हे दोन डॉक्टर तिथे नसते तर या मुलीचं जगणं मुश्किल झालं असतं, असं सूत्रांनी सांगितलं.
अन्सारी कुटुंब हे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सय्यद नगरचं आहे. हे कुटुंब पुण्यात नातेवाईकाच्या लग्नाला आलं होतं. लग्न समारंभ आटोपल्यानंतर पिकनिकला म्हणून ते लोणावळ्याच्या भूशी डॅमला आले होते. एकूण 17 लोक डॅमला आले होते. दुपारी सर्वजण भूशी डॅमच्या मागे धबधब्याखाली गेले. याचवेळी भूशी डॅमच्या कॅचमेंट एरियात प्रचंड पाऊस झाला. प्रचंड पाऊस झाल्याने भूशी डॅम ओव्हरफ्लो झाला. धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याचा फ्लो वाढेल असं अन्सारी कुटुंबाला वाटलं नव्हतं.
जेव्हा अचानक पाण्याची पातळी वाढली आणि पाण्याचा वेग वाढला तेव्हा सर्वांनी एका दगडावर उभं राहून वाचवण्याचा प्रयत्न केला. सर्वजण एकमेकांना बिलगून होते. काही लोक सुरक्षित ठिकाणी होते. तर काही कॅचमेंट एरियाजवळ होते. या पाण्यात एकूण 10 लोक अडकले. त्यापैकी पाच लोकांना वाचवण्यात यश आलं. तर पाच लोक वाहून गेले. पहिल्या दिवशी वाहून गेलेल्या पाच जणांपैकी तिघांचे मृतदेह लगेचच सापडले. तर एकाचा मृतदेह उशीरा सापडला. तर आणखी एकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला होता.
यावेळी अन्सारी यांच्या कुटुंबातील एका मुलीचा श्वास बंद पडला. तिच्या हृदयाचे ठोकेही येईनासे झाले होते. नशीब बलवत्तर म्हणून तिथे फिरायला आलेल्या दोन डॉक्टरांनी तात्काळ तिच्यावर उपचार सुरू केले. तिला सीपीआर देऊन जीवनदान दिलं. तिला तोंडाने श्वास देऊन तिचा श्वासोच्छवास सुरू करण्यात आला. त्यामुळे ही मुलगी वाचली. त्यानंतर तिला रुग्णालयात भरती करण्यात आले.