Pune Metro Protest : ‘नाहीतर उद्या चौकाच्या उद्गाटनाला येतील’, पुणे मेट्रोवरुन रवींद्र धंगेकर आक्रमक
Pune Metro Protest : "दोन दिवसांनी केबिनमध्ये उद्घाटन करणार, तर आता करा. पुणेकरांना वेठीस धरण्याचा अधिकार यांना कोणी दिला?" असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला.
पावसामुळे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला. त्यामुळे शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच उद्घाटन होऊ शकलं नाही. त्यावरुन महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. मविआचे पुण्यातील नेते आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांना अडवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करावा लागला.
पुण्यातील कसबा पेठचे आमदार, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर या मेट्रो आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी सत्ताधारी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचे आसूड ओढले. “दोन दिवसांनी केबिनमध्ये उद्घाटन करणार, तर आता करा. पुणेकरांना वेठीस धरण्याचा अधिकार यांना कोणी दिला?” असा सवाल त्यांनी केला. “टप्याटप्याने असं उद्घाटन होतं का? पंतप्रधान 2016, 2018, 2022, 2023 ला उद्घाटनासाठी आले. महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा केविलवाणा प्रयत्न आहे” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
आता पुणे मेट्रोच उद्घाटन कधी?
“पंतप्रधानांच्या उंचीच्या माणसाने कुठली उद्घटन करावी याची अचारसंहिता तयार करावी लागेल, नाहीतर उद्या चौकाच्या उद्गाटनाला येतील” अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली. सत्ताधारी म्हणातात, ही स्टंटबाजी आहे. त्यावर रवींद्र धंगेकर म्हणाले की, “पंतप्रधान टप्याटप्याने उद्घटन करत असतील तर ते चुकीच आहे की, बरोबर हे पुणेकर म्हणून त्यांनी छातीवर हात ठेवून सांगाव” “लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिलाय, त्यात पुणेकरांची बाजू मांडतोय. कालच्या सारखं पुन्हा झालं, मग चार दिवस उद्घटन पुढे जाणार का?” असा सवाल धंगेकर यांनी विचारला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आता येत्या रविवारी या मेट्रो मार्गाचं ऑनलाइन उद्घाटन करणार आहेत.