महायुती बिघाडी, महत्वाच्या पक्षाची वेगळी वाट, मेळाव्यात सहभागी न होण्याचे आदेश
महायुतीचे राज्यभरात मेळावे सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी हे मेळावे घेतले जात आहे. या मेळाव्यासाठी पाच पक्ष एकत्र आले आहेत. एकत्र येऊन मेळावा घेण्याचा निर्णय महायुतीने जाहीर केला होता. परंतु महायुतीत पक्षांमध्ये रुसवे फुगवे सुरु झाले आहे.
योगेश बोरसे, पुणे, दि.15 जानेवारी 2024 | महायुतीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. महायुतीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले गट आणि राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) आहेत. महायुतीमधील या पाच पक्षांनी एकत्र येऊन मेळावा घेण्याचा निर्णय जाहीर केले आहे. परंतु महायुतीत पक्षांमध्ये रुसवे फुगवे सुरु झाले आहे. यामुळे महायुतीच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचे आदेश रासपच्या वरिष्ठ स्तरावरुन मिळाले आहे. भाजप आणि रासप अध्यक्ष महादेव जानकर यांचे संबंध सध्या ताणले गेले आहे. यामुळे हा बहिष्कार टाकल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीच्या मेळाव्याच्या बॅनरवर महादेव जानकर यांचा फोटो आहे.
राज्यभरात महायुतीचे मेळावे
भाजप आणि मित्रपक्षाकडून राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यासाठी राज्यातील ४८ मतदार संघात मेळावे घेतले जात आहे. परंतु राज्यभरात महायुतीच्या मेळाव्यात सहभागी होवू नका, असे आदेश रासपच्या वरिष्ठ स्ततरावरून देण्यात आले आहे. महादेव जानकर महायुतीपासून वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
पुणे शहरात आज मेळावा, रासपचा बहिष्कार
पुण्यात आज महायुतीचा मेळावा होणार आहे. महायुतीच्या या कार्यक्रमावर रासपचा बहिष्कार आहे. महायुतीच्या बॅनरवर महादेव जानकर यांचा फोटो असला तरी वरुण आदेश आल्याशिवाय सहभागी होवू नका अशा सूचना रासपकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान रासपची महाविकास आघाडीत जाण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. रासपने महाविकास आघाडीकडे दोन जागा मागितल्या असल्याचे म्हटले जात आहे.
नगरमध्ये दिसली गटबाजी
अहमदनगरला महायुतीचा मेळावा पार पडला या मेळाव्यात भाजपा आमदार राम शिंदे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोरच नाव न घेता विखे पिता-पुतवर शिंदे यांनी टोमणे मारले आहे. चिंता करू नका, अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्याकडे विकसित तंत्रज्ञान आहे, त्यामुळे त्यांना कोण काय करत आहे आता माहित आहे, असे वक्तव्य करत विखे यांना सूचक इशारा राम शिंदे यांनी दिला. तसेच वसुंधरा राजे आणि शिवराज सिंग चव्हाण यांचे उदाहरण देत विखे पिता- पुत्रांना टोले लगावले आहे.