पुण्यातील कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या लेशपाल याचं घेतलं पालकत्व; ‘या’ पक्षाने केली घोषणा

| Updated on: Jun 29, 2023 | 9:03 AM

लेशपाल जवळगे या तरुणाने जीव धोक्यात घालून एका तरुणीला वाचवलं. तिच्यावर कोयत्याने हल्ला होणार असताना त्याने या तरुणीला वाचवलं. आता त्याचं कौतुक होत आहे.

पुण्यातील कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या लेशपाल याचं घेतलं पालकत्व; या पक्षाने केली घोषणा
leshpal jawalge
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : पुण्यातील कोयता हल्ला प्रकरणानंतर लेशपाल जवळगे चांगलाच चर्चेत आला आहे. लेशपाल याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अनेक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनीही लेशपाल याचं कौतुक केलं आहे. जीव धोक्यात घालून लेशपालने कोयता हल्ल्यातून एका तरुणीचा जीव वाचवला. त्यामुळे त्याच्यावर हा कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लेशपालच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. तर एका राजकीय पक्षाने चक्क लेशपालचं पालकत्व घेतलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही लेशपालचं पालकत्व घ्यावं, असं आवाहन या राजकीय पक्षाने केलं आहे.

कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाने लेशपाल जवळगे याच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते लेशपाल जवळगे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महादेव जानकर यांनी लेशपाल जवळगे याच्या धाडसाचं कौतुक करून त्यानं यूपीएससीत यश मिळवावे अशी आशा व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

यशपालने यूपीएससी पास करून आयएएस किंवा आयपीएस व्हावं, अशी आशा व्यक्त करतानाच आम्ही लेशपाल याचं पालकत्व स्वीकारत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील लेशपाल जवळगे याचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलं.

पाच लाखाचं बक्षीस जाहीर

दरम्यान, कोयता हल्ल्यातून तरुणीचा जीव वाचवल्याच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. शिंदे यांनी या हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या दोन्ही तरुणांना प्रत्येकी पाच लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. येत्या एक ते दोन दिवसात या तरुणांना बक्षिस दिलं जाणार असल्याचं शिवसेना शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सांगितलं. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.

काय घडलं?

पुण्यात एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा एका तरुणाने प्रयत्न केला होता. हा तरुण कोयता घेऊन या तरुणीच्या मागे धावत होता. आजूबाजूला लोक होते. पण कुणीही तिच्या मदतीला धावले नाही. पण लेशपाल जवळगे या तरुणाने जीवाची पर्वा न करता धाडस दाखवत या तरुणीचा जीव वाचवला.

तसेच कोयता घेऊन तरुणीवर वार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला पोलिसांच्या हवाली केले होते. त्यामुळे लेशपाल यांचं कौतुक होत होतं. मात्र, दुसऱ्या बाजूने दिवसाढवळ्या पुण्यात तरुणीवर हल्ला होण्याच्या घटनेने पुणेकर हादरून गेले आहेत. आधीच दर्शना पवार हिच्या हत्याकांडाने पुणे हादरलेले असतानाच हा दुसरा प्रकार होता होता वाचला. त्यामुळे पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.