‘मलाही सर्व भाषा वापरता येते’, अजित पवार पत्रकारावर संतापले, पाहा नेमकं काय म्हणाले
उपमुख्यमंत्री अजित पवार आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर संतापले. आपल्यालाही सर्व भाषेत उत्तर देता येतं, असा इशारा अजित पवार यांनी पत्रकाराला दिलं.
पुणे | 1 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार चांगलेच संतापले. तसेच आपल्यालाही सर्व भाषा वापरता येते, असं इशारा अजित पवार यांनी दिला. “अजित दादा विरोधी पक्षनेते असताना तुम्ही भाजपवर टीका करायचे. आता भाजपचं कौतुक करत आहात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज तुमचं कौतुक केलं, तुमची नेमकी काय भूमिका आहे?”, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर अजित पवार यांनी “आम्ही काय एकमेकांवर बांध रेटलाय का?”, असा उलटसवाल केला.
“तू प्रश्न विचारलेला आज मला आवडलेला नाही. पुढच्यावेळेस प्रश्न विचारलेला आवडला तर मग मी तुला जर प्रोत्साहन दिलं तर तुला काही वाईट वाटायचं कारण नाही”, असा इशारा अजित पवार यांनी पत्राकाराला दिला.
‘मी सत्तेसाठी नाही तर…’
“आम्ही गेले 9 वर्षे त्यांचं काम पाहतोय. आज जागतिक स्तरावर नरेंद्र मोदी यांच्यासारखा लोकप्रिय नेता दुसरा कोणी बघायला मिळत नाहीय. जे सत्य आहे ते सत्य आहे. मला विकास पाहिजे. आपण विरोधी पक्षात आंदोलन करु शकतो, आपण मोर्चा काढू शकतो, आपण मागण्या करु शकतो. निर्णय घेण्याचा अधिकार शेवटी राज्यकर्त्यांचा असतो. मी सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी गेलो आहे. महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेलो”, असं अजित पवार म्हणाले.
‘अशापद्धतीने भाषा वापरली तर मलाही सर्व भाषा वापरता येते’
यावेळी संबंधित पत्रकार पुन्हा एक प्रश्न विचारू लागला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, “तेव्हा कामे चालूच होती. तुला सकाळपासून कुणी भेटलं नाही का? उद्या तुम्ही वेळ दिला तर माझाही वेळ नीट घ्या. जर अशापद्धतीने भाषा वापरली तर मलाही सर्व भाषा वापरता येते”, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
“मी विकासासाठी गेलो आहे. राज्याचे प्रश्न केंद्र सरकारकडे मार्गी लागावेत याकरता गेलो आहे. शेतकऱ्यांचे, तरुणांचे काही प्रश्न आहे. उद्योगधंदे महाराष्ट्रात आले पाहिजेत. त्यासाठी पोषण वातावरण तयार झालं पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.