धावत्या ट्रेनमध्ये चिमुकल्याचा श्वास कोंडला, तिकीट पर्यवेक्षकाने कसे दिले जीवदान?
लेकराची अवस्था पाहून कुटुंबीयांचा जीवही खाली-वर होत होता. बाळाचा श्वास गुदमरला होता. त्याचे डोळे पांढरे झाले होते. त्यामुळे नातेवाईकांसह इतर प्रवाशांचेही धाबे दणाणले.
पुणे : पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये चिमुरड्याचा श्वास थांबल्याने घबराट पसरली होती. मात्र देवदूताच्या रुपात आलेल्या रेल्वेतील तिकीट पर्यवेक्षकाने सीपीआर देऊन बाळाचे प्राण वाचवले. त्यामुळे कुटुंबीयांसह डब्यातील सर्व प्रवाशांचा जीवही भांड्यात पडला.
नेमकं काय घडलं?
पुणे रेल्वे स्थानकातून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये रविवारी सकाळी हा प्रकार घडला. हे कुटुंब एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी सांगलीला जात होतं. प्रवास सुरु करण्यापूर्वी बाळाची प्रकृती ठणठणीत होती. मात्र वठार स्थानक गेल्यानंतर दोन वर्षांच्या चिमुकल्याचा श्वास थांबून हृदयाचे ठोकेही बंद पडत होते.
लेकराची अवस्था पाहून कुटुंबीयांचा जीवही खाली-वर होत होता. बाळाचा श्वास गुदमरला होता. त्याचे डोळे पांढरे झाले होते. त्यामुळे नातेवाईकांसह इतर प्रवाशांचेही धाबे दणाणले.
तिकीट पर्यवेक्षक मदतीसाठी पुढे
डब्यात असणारे तिकीट पर्यवेक्षक राजेंद्र काटकर मदतीसाठी पुढे आले. काटकर यांनी बाळाला सलग 10 ते 15 मिनिटे आपल्या तोंडावाटे श्वास दिला. तरीही बाळाच्या प्रकृतीत सुधारणा दिसेना. अखेर 15 मिनिटांच्या प्रयत्नानंतर काटकर यांना यश आले आणि बाळ रडू लागले. त्यामुळे कुटुंबासह सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
उपचारानंतर दोन तासांनी बाळाला डिस्चार्ज
इतक्यावरच न थांबता, काटकर यांनी सातारा रेल्वे स्थानकावर डॉक्टर आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. बाळाला साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर दोन तासांनी बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र हा प्रवास कुटुंबासह डब्यातील प्रत्येक प्रवाशासाठी संस्मरणीय ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
पालघरमधील ‘त्या’ नवजात बाळाची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू
नागपुरात तिसऱ्या लाटेचे संकेत, 12 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू