Maharashtra HSC Result 2021 declared : बारावीचा निकाल 99.63 टक्के, यंदाच्या निकालातही मुलींची बाजी
Maharashtra HSC Result 2021 Declared : बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला असून यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
HSC Result declared : महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता (Maharashtra HSC Result 2021) होती. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यानुसार राज्याचा 12 वी निकाल 99.63 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.in, https://msbshse.co.in , hscresult.mkcl.org आणि mahresult.nic.in. या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.
दिनकर पाटील काय म्हणाले?
कोविड मुळे बारावीची परीक्षा यंदा घेता आली नाही. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आलाय. दुपारी चार वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. महापुरामुळे निकाल उशिरा जाहीर होतोय. बारावीचा एकूण निकाल 99.63 टक्के लागला आहे. विज्ञान 99.45 टक्के, वाणिज्य 99.91 टक्के, कला 99.83 टक्के लागला असून यावर्षी 2.92 टक्क्यांनी निकाल वाढलाय, अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.
निकालाची सविस्तर आकडेवारी
6, 542 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 35 टक्के गुण मिळालेले 12 विद्यार्थी आहेत. 46 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. 1319754 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी 1314965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल 99. 63 टक्के लागला आहे.
66871 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 66867 विद्यार्थी उत्तीर्ण एकूण निकाल 94.31 टक्के लागला आहे.
बारावी निकालातही कोकणाची बाजी
दहावीच्या निकालाप्रमाणं कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.81 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा निकाल 99.34 टक्के लागला आहे.
निकालाची विभागवार टक्केवारी
1) कोकण : 99.81 2) मुंबई : 99.79 3) पुणे : 99.75 4) कोल्हापूर : 99.67 5) लातूर : 99.65 6) नागपूर : 99.62 7) नाशिक : 99.61 8) अमरावती : 99.37 9) औरंगाबाद : 99.34
यंदाच्या निकालातही मुलींची बाजी
गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या निकालात मुली अग्रेसर राहत असल्याचं दिसून आलं आहे. त्याप्रमाणं यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी माहली आहे. मुलींचा निकाल 99.81 टक्के तर मुलांचा निकाल 99.54 टक्के लागला आहे. मागच्या वर्षी मुलांचा निकाल 90.66 टक्के होता.
कला शाखेचा निकाल वाढला
विज्ञान शाखेचा मागील वर्षीचा निकाल 96.93 टक्के लागला होता. तर यावर्षी 99.45 टक्के लागला म्हणजेच 2.52 टक्क्यांनी निकाल जास्त लागला आहे. कला शाखेचा मागील वर्षी चा निकाल 82.63 टक्के लागला होता तो यावर्षी 99.45 टक्के म्हणजेच 17.20 टक्क्यांनी जास्त लागला आहे. वाणिज्य शाखेचा मागील वर्षीचा निकाल 91.27 टक्के लागला होता. तर, यावर्षी 99.91 टक्के निकाल जाहीर झाला आहे. म्हणजेच 8.64 टक्क्यांनी निकाल जास्त लागला आहे.
बारावीचा निकाल कुठे पाहायचा?
विद्यार्थी त्यांचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.in, https://msbshse.co.in , hscresult.mkcl.org आणि mahresult.nic.in. या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.
इतर बातम्या:
HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage : बारावीचा निकाल जाहीर, 99.63% विद्यार्थी पास
Maharashtra HSC Result 2021 declared LIVE Updates : बारावीचा निकाल जाहीर