पुणे | 9 सप्टेंबर 2023 : ऑगस्ट महिन्यात दडी मारला पावसाचे महिन्याभरानंतर जोरदार कमबॅक झाले आहे. राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. गोकुळ अष्टमीनंतर राज्यात पाऊस सक्रीय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सर्वत्र जलधारा कोसळत आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच कोयनासह राज्यातील इतर धरणांच्या जलसाठ्यात आवक सुरु झाली आहे. यामुळे महिन्याभरापासून असलेली चिंता आता मिटली आहे. पावसाचा जोर अजून काही दिवस राहणार आहे.
राज्यातील सहा जिल्ह्यांना शनिवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यात पुणे, सातारा, रत्नागिरी, ठाणे, नाशिक, पालघरचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यातील इतर सर्व भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. फक्त नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत पावसाचा कोणताही अलर्ट नाही. तरी या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचा परिणाम अरबी समुद्रालाही जाणवत आहेत.
राज्यात १७ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील दोन दिवस अजून राज्यात सर्वत्र पाऊस आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार असून पुन्हा १४ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पावसाचा फायदा रब्बी हंगामाला होणार आहे.
कोकणातील अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. रत्नागिरीत शुक्रवारी पहाटेपासून सुरू असलेला मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. परभणी जिल्ह्यात पावसाने जोरदार कमबॅक झाले आहे. गेल्या 24 तासांत 18 मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाला आहे. धुळे जिल्ह्यात पहाटे तीन वाजल्यापासून दमदार पाऊस सुरु झाला आहे. नाशिक शहरात सकाळपासून पाऊस सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय आहे.