पुणे | 10 सप्टेंबर 2023 : राज्यात महिन्याभरानंतर सर्वत्र पाऊस सुरु झाला आहे. या पावसामुळे धोक्यात आलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सुरु आहे. नाशिकमध्ये यंदा प्रथमच गोदावरी नदीला पूर झाला. या पावसामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात दहा टक्के वाढ झाली आहे. आता पावसाचा हा जोर किती दिवस कायम राहणार आहे? यासंदर्भात हवामान विभागाने माहिती दिली आहे.
राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. यामुळे सर्वत्र पाऊस होत आहे. राज्यात पावसाचा हा जोर अजून कायम राहणार आहे. १४ ते १९ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये चांगला पाऊस होईल, असा अंदाज पुणे हवामान विभागातील शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे. तसेच आगामी चार आठवडे पाऊस कायम असणार आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुटीवर असलेला पाऊस आपली सरासरी पूर्ण करणार असल्याची शक्यता आहे.
10 Sept:
14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर, महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये मान्सूनचा आणखी एक चांगला कालावधी. 🌧🌧☔
चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
Keep watch on IMD updates please. pic.twitter.com/T1OWwTGlSN— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 10, 2023
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईला यलो अलर्ट असला तरी ठाणे जिल्ह्याला कोणताही अलर्ट दिला नाही. मध्ये महाराष्ट्रातील नगर, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह कोकणातही यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर, जालना या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट दिला नाही. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट असणार आहे.
राज्यात बऱ्याच कालावधीनंतर पाऊस सुरू आहे. परभणी जिल्ह्यात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात दुथडी भरुन वाहणाऱ्या गोदावरी, पूर्णा आणि दुधना या प्रमुख नद्या अद्याप कोरड्या आहेत. बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात 30 टक्के जलसाठा झाला आहे. मागच्या आठवड्यात या धरणात फक्त 20 टक्के जलसाठा होता.