Maharashtra Rain | संपूर्ण महाराष्ट्राला अलर्ट, पाऊस धुवाँधार, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस पडतोय. नुकतंच कल्याण-डोंबिवली शहरात प्रचंड पाऊस पडलाय. याशिवाय घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस कोसळतोय. हवामान विभागाकडून पावसाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. त्यामुळे गणेश विसर्जनासाठी घराबाहेर पडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
अभिजीत पोते, Tv9 मराठी, पुणे | 27 सप्टेंबर 2023 : राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे सध्या गणेशोत्सव आहे. या उत्सवाच्या दिवसांपैकी उद्या महत्त्वाचा दिवस आहे. उद्या अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे लाखो भाविक उद्या गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडतील. पण याच वेळी पावसाची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हवामान विभागाकडून उद्या पुणे शहरासह जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील अनेक जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणात ऑरेंज अलर्ट करण्यात आलाय. पुण्यात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उद्या मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मेघगर्जनासह पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यात पुढचे आणखी काही दिवस पाऊस सक्रिय राहणार असल्याची माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिलीय.
हवामान विभागाचा नेमका अलर्ट काय?
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सप्टेंबरच्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस सक्रिय असेल. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. उद्या दक्षिण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उद्या दुपारी पाऊस पडणार
उद्या अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी शेकडो भाविक घराबाहेर पडतील. पण हवामान विभागाने पावासाचा इशारा दिलाय. उद्या दुपारच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उद्या दक्षिण कोकणात पावसाचा जोर जास्त असेल. तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, असं के. एस. होसाळीकर यांनी सांगितलं.
मराठवाड्यातही पावसाचा अंदाज
नाशिक, पुणे, सातारा, सांगलीच्या घाट परिसरात ढग निर्माण झाले आहेत. कोकणातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे आज कोकणात आजही प्रचंड पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ढग दिसत आहेत. पण हे ढगदेखील मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस देऊ शकतात, ज्याची गरज सध्या मराठवाड्याला आहे. गेल्या आठवड्याभरात मराठवाड्यातील पावसाची स्थिती सकारात्मकरित्या बदलली आहे. हे शेतीसाठी आणि आगामी हंगामासाठी फायदेशीर आहे, असं देखील के. एस. होसाळीकर यांनी सांगितलं.