Monsoon Rain : महाराष्ट्राला ‘यलो’ अलर्ट! उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, कुठे कुठे पावसाची शक्यता?
Maharashtra Rain Update : मान्सूनचा पाऊस अंदमानात वेळेत पोहोचला असला तरी केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास उशीर झालाय. त्यामुळे राज्यात मान्सूनचं आगमनही लांबणीवर पडलंय.
मुंबई : मान्सूनचं (Monsoon Rain Update) आगमन लांबणीवर पडलं असलं, तरी दिलासादायक अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आलाय. येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातही पाऊस होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलंय. राज्यात हवामान खात्यानं पावसाचा यलो अलर्टही (Maharashtra Rain Yellow Alert) दिलाय. मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा होऊन पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असल्यानं वातावरणातही बदल जाणवणार आहे. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 30 मे पासून 1 जून पर्यंत पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
थोडक्यात पण महत्त्वाचं
- 30 मे ते 1 जून या काळात यलो अलर्ट
- कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवड्याला यलो अलर्ट
- विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज
- मेघगर्जनेसह सोसाट्याचे वारे वाहू शकतात, असा हवामान विभागाचा अंदाज
पारा घसरला
गेल्या काही दिवसांत तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. तसंच कोकणातील काही भागात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या आहेत. वातावरणही ढगाळ असल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान, येत्या तीन दिवसांत आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
Rain and winds pattern forecast as per the Extended Range Forecast by IMD, issued this week for next 4 weeks. Pl see the dates in red …. pic.twitter.com/xf7A9eKReh
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 28, 2022
मान्सून लांबला..
मान्सूनचा पाऊस अंदमानात वेळेत पोहोचला असला तरी केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास उशीर झालाय. त्यामुळे राज्यात मान्सूनचं आगमनही लांबणीवर पडलंय. आता सात जून ते दहा जून या दरम्यान, राज्यात मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान, येत्या 48 तासांत मान्सूनचा पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यताय.
#SWMonsoon2022 28 May: पुढील २-३ दिवसांत केरळमध्ये मान्सून येण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. याच कालावधीत अरबी समुद्र, लक्षद्वीप परिसरात आणखी काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. – IMD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 28, 2022
विदर्भाला दिलासा..
उष्णतेच्या लाटेत होरपळलेल्या विदर्भाला दिलासा मिळण्याची शक्यता. पावसाच्या शक्यतेमुळे पारा खाली घसरुन नागरिकांना दिलासा मिळेल, असा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नागपुरात मुसळधार पाऊस झाला होता. मान्सूनपूर्व सरींची राज्याच्या वेगवेगळ्या भागात हजेरीही गेल्या दोन दिवसांत पाहायला मिळाली आहे. आता संपूर्ण राज्याला मान्सूनची प्रतीक्षा आहे.