दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘ही’ परीक्षा पुढे ढकलली
दहावीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पुणे | 19 जुलै 2023 : दहावी बारावीच्या परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांची आणखी एक अंतिम परीक्षा होते. ही परीक्षा पुरवणी परीक्षा किंवा ऑक्टोबरची परीक्षा म्हणून ओळखली जाते. ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. पण यावर्षी शासनाने दहावीची परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. या वेळापत्रकानुसार उद्या दहावीच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा होती. पण पावसामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहावीची उद्या होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने याबाबत निर्णय घेतला आहे. उद्या राज्यातील विविध जिल्ह्यांत पुरवणी परीक्षा होणार होती. पण अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 2 ऑगस्टला होणार आहे.
राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत. राज्यात सर्वदूर पाऊस प्रचंड पडतोय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधदुर्ग जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरांमध्ये आणखी मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. अनावश्यक घराबाहेर पडू नका, असं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दहावी बोर्डाची पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.