आपल्याच पक्षाच्या महिला नेत्याविरोधात रुपाली चाकणकर कारवाई करणार, शेवटी जबाबदारी महत्त्वाची
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यासमोर पक्ष महत्त्वाचा की जबाबदारी महत्त्वाची? अशी परिस्थिती निर्माण झालीय.
योगेश बोरसे, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यासमोर पक्ष महत्त्वाचा की जबाबदारी महत्त्वाची? अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्या रुपाली पाटील यांच्याविरोधात काही संघटनांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींची दखल घेऊन रुपाली पाटील यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती स्वत: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलीय. याचाच अर्थ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी रुपाली चाकणकर यांना आपल्याच पक्षातील एका सहकारी महिला नेत्यावर कारवाई करावी लागणार आहे.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी महिला आयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर कारवाई करणार, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलीय.
“यासंदर्भात काही सामाजिक संघटनांच्या तक्रारी आल्या आहेत. एखाद्या पीडितेची ओळख मिडियासमोर आणणे चुकीचे आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांना महिला आयोग पत्र लिहिणार आहे”, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली.
“राहुल शेवाळे प्रकरणी पोलिसांवर केंद्र आणि राज्य सरकारचा दबाव आहे. या प्रकरणी महिला आयोगाने पोलिसांना आतापर्यंत 6 पत्र लिहिली आहेत”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
दरम्यान, अभिनेत्री तुनिशा शर्मा यांच्या आत्महत्येबाबत लव्ह जिहादचा रंग देणे चुकीचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.