महायुतीचा विधान परिषदेच्या आमदारांचा फॉर्म्युला ठरला, सूत्रांकडून मोठी बातमी
महायुतीचा विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित आहे. या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात चांगलाच संघर्ष बघायला मिळाला.
योगेश बोरसे, Tv9 मराठी, पुणे | 3 ऑक्टोबर 2023 : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात ट्विस्ट आणणारी बातमी समोर आली आहे. याप्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडलीय. हे प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित आहे. कोर्टाने राज्य सरकारला काउंटर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पण सरकारकडून सातत्याने वेळ वाढवून मागितला जातोय. असं असताना आता सरकारने या प्रकरणी हालाचाली सुरु केल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत महायुतीचा फॉर्म्युलादेखील ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातच विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती करणं अपेक्षित होतं. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांसाठी नावे सूचवली होती. पण तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने सूचवलेल्या नावांची नियुक्ती केली नव्हती. कोश्यारी यांनी जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त काळ याबाबत निर्णय न घेतल्याने महाविकास आघाडी सरकार याप्रकरणी कोर्टात गेलं होतं.
कोर्टाचा नियुक्तीला स्थगिती आदेश
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबत हालाचाली सुरु झाल्या होत्या. शिंदे सरकारने याबाबत आपल्या मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी हालचाली सुरु केल्याची चर्चा होती. पण सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली तेव्हा कोर्टाने नियुक्तीवर स्थगितीचा आदेश दिला.
राज्य सरकारला काउंटर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
महाविकास आघाडीकडून या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारला काउंटर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. पण राज्य सरकारने अद्याप हे प्रतिज्ञापत्र दाखल केलंच नाही. त्यामुळे या प्रकरणी सध्या तारीख-पे-तारीखच सुरु आहे. यादरम्यान अचानक या प्रकरणात आता हालचाली सुरु झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीचा याबाबतचा फॉर्म्युला ठरलाय.
महायुतीचा नेमका फॉर्म्युला काय?
महायुतीचा विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विधान परिषदेच्या आमदारांसाठी 6-3-3 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजपला 6, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा देण्याचा फॉर्म्युला ठरला आहे. या 12 आमदारांची नावे लवकरच निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. तसेच ती लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.