Pune crime : मावशीसह करत होता घरफोड्या, गुन्हे शाखेच्या पथकानं ठोकल्या बेड्या; लोणी काळभोरमधला प्रकार
पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सहाव्या पथकाने घरफोडीच्या किमान सात घटनांप्रकरणी एका व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे. मोहन देविदास बनसोडे (वय 21, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
पुणे : पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सहाव्या पथकाने घरफोडी झाल्याच्या किमान सात घटनांप्रकरणी एका व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे. मोहन देविदास बनसोडे (वय 21, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. लोणी काळभोर (Loni Kalbhor) पोलीस ठाण्यातील एका चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून अधिक चौकशीत त्याने किमान सात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि 5 लाखांची रोकड जप्त केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी सांगितले, की बनसोडे व्यतिरिक्त त्याच्या मावशीचाही या गुन्ह्यात सहभाग असून तिला पकडण्यासाठी तपास सुरू आहे. बुधवारी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
गुन्हे शाखेकडे तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत. त्यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तपास सुरू झाला. गुन्हे शाखेच्या सहाव्या पथकाकडे याचा तपास सुरू होता. त्यातच मोहन देविदास बनसोडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून तब्बल पाच लाख आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
मावशी फरार
अधिक तपासासाठी त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दुसरीकडे मावशीच्या सहाय्याने तो चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. आता त्याच्या मावशीचा शोध पोलीस घेत आहेत.