मनोज जरांगे आधी पुण्यात नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात, वाहतुकीत बदल
Jarange Patil Kharadi Pune | मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची पुणे आणि मुंबईत सभा होणार आहे. पुण्यातील खराडीत होणाऱ्या सभेपूर्वी बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात मनोज जरांगे शक्तीप्रदर्शन करणार आहे.
अभिजित पोते, पुणे, सुनिल जाधव, ठाणे दि. 20 नोव्हेंबर | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रानंतर सोमवारी मनोज जरांगे पाटील यांची पुणे शहरातील खराडीत सभा होत आहे. तसेच संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यात सभा होणार आहे. ठाणे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील मोठे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. कल्याण, डोंबिवली परिसरात ही सभा होणार आहे. त्यासाठी मराठा बांधव सज्ज झाले आहे. बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
पुण्यात वाहतुकीत बदल
पुणे शहरातील खराडी भागात मनोज जरांगे पाटील यांची सभा सोमवारी होत आहे. या सभेच्या निमित्ताने पुणे नगर रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. आज दिवसभर नगर रोडवर जड वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरून पुण्यात येणारी सर्व वाहने हडपसरच्या बाजूने वळवण्यात आली आहे. तसेच हडपसर सासवडकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी सोलापूर रोड मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. शिक्रापूर येथून पुणे शहराकडे येणारी वाहने चाकण भोसरी मार्ग वापरत पुणे मुंबईकडे जाणार आहेत. तर खराडी बायपासवरून जुना पुणे, मुंबई रोडवरील वाहने हडपसर मार्गे पुण्यात जाणार आहे. मनोज जरांगे पाटील आज छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी अभिवादन करणार आहे.
कल्याण डोंबिवलीत बॅनरबाजी
मनोज जरांगे पाटील याच्या स्वागतासाठी कल्याण, डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली. आवाज मराठ्यांचा साथ जनमानसांची, एक मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा अशा आशयाचे बॅनर शहरात लागले आहे. सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास कल्याण पूर्व येथील कुठे मैदानात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. वीस हजार लोकांची क्षमता असणाऱ्या या मैदानाचे आठ सेक्टर करण्यात आले आहे. या ठिकाणी सहा एलईडी स्किन लावली जाणार आहे. रस्त्यावर फुलांचा सडा टाकून जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही पहिली सभा असल्याने मराठा समाजाकडून बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.