पुणे, दि.16 जानेवारी 2024 | पुणे विमानतळावर दोन दिवसांपासून गोंधळ सुरु आहे. पुणे शहराकडून इतर शहरांकडे जाणाऱ्या विमानफेऱ्या रद्द होत आहेत. यामुळे प्रवाशी आक्रमक झाले आहेत. रविवारी नऊ तर सोमवारी ११ फेऱ्या रद्द झाल्या. सोमवारी दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान रद्द झाले. त्यानंतर विमानतळावर आलेले प्रवाशी आक्रमक झाले. काही प्रवाशी संबंधित विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. यामुळे विमानतळावर सीआयएसएफचा (केन्द्रीय औद्योगिक सुरक्षा दल) बंदोबस्त वाढवण्यात आला. दिल्ली, चेन्नई, नागपूर, हैदराबाद, जयपूर, गुवाहाटी, चंदीगड, कोलकता, बंगळूर या शहरांकडे जाणाऱ्या विमान फेऱ्या रद्द झाल्या होत्या.
मागील काही दिवसांपासून दिल्लीतील हवामान खराब झाले आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. वैमानिकांना विमानांचे उड्डाण करणे अवघड झाले आहे. यामुळे विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी विमान फेऱ्या रद्द केल्या आहेत. सोमवारी ११ तर रविवारी ९ विमान फेऱ्या रद्द झाल्या. ऐनवेळी विमानफेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना पर्याय राहिला नाही. यामुळे प्रवाशांनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यातून गोंधळ निर्माण झाला.
विमान कंपन्यांनी प्रवाशांना सुरुवातीपासून स्पष्ट कारण दिले नाही. विमानाला उशीर होणार असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. त्यामुळे प्रवासी निश्चिंत होते. मात्र दुपारनंतर विमान रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे टर्मिनलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत गेली आणि गोंधळ उडाला. उत्तर भारतात सध्या धुक्याचे वातावरण आहे. त्याचा फटका विमानसेवेला बसला आहे. पाच दिवसांपासून हा गोंधळ सुरु आहे.
दिल्लीत चार धावपट्ट्या आहेत. त्यापैकी तीन धावपट्यांचा वापर सुरु आहे. एक धावपट्टी दुरुस्तीमुळे बंद आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी धुक्यामुळे येणारे अडथळे कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. पुणे शहरातून हजारो जण रोज विमानाने प्रवास करत असतात. त्या प्रवाशांना उत्तर भारतातील वातावरणचा फटका बसला आहे.