अजित पवार यांनी टोचले मनोज जरांगे यांचे कान…भुजबळांची भूमिका नेली पुढे
NCP convention in Karjat Ajit Pawar | महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरुन सध्या जाती जातीत भांडणे उभी राहिली आहे, हे दुर्देवी आहे. शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. परंतु आता तेढ निर्माण केला जात आहे. यातून राज्यात दंगली घडल्या तर जबाबदार कोण?
कर्जत, पुणे | 1 डिसेंबर 2023 : राज्यात गेल्या काही विषयांवरुन मराठा आरक्षणावरुन जोरदार चर्चा होत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे. यासंदर्भात सर्व पक्षीय नेत्यांनी ठराव करुन मराठा समाजास आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केली आहे. परंतु त्यानंतर छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष उभा राहिला आहे. अजित पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात प्रथमच रोखठोक भूमिका जाहीर केली. त्यातून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे कान टोचले. तसेच छगन भुजबळ यांची भूमिकाच पुढे नेते महापुरुषांची उदाहरणे दिली. अजित पवार यांनी आपल्या भाषणात कोणाचे नाव न घेता सर्वकाही सांगून दिले.
काय म्हणाले अजित पवार
जातीचा अभिमान जरु जपा. पण इतर जातीसंदर्भात द्वेष मनात ठेऊ नका. एखादा समाजाचा प्रश्न सोडवत असताना इतरांवर अन्याय होणार नाही, याची काळजी आपणास घ्यावी लागणार आहे. एखादा समाजाचे मागासलेपण काळानुसार झाले असेल तर ते तपासण्यासाठी वेळ लागतो, हे लक्षात घ्या. मराठा समाजातील आरक्षण देताना इम्पेरिकल डाटा महत्वाचा आहे. त्याशिवाय आरक्षण टिकत नाही. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. यामुळे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे.
महापुरुषांच्या स्वप्नातील हाच महाराष्ट्र आहे का?
सध्या जाती जातीत भांडणे उभी राहिली आहे, हे दुर्देवी आहे. शिवाजी महाराजांनी १८ पगडा जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. पण आज महाराष्ट्रात काय सुरु आहे? त्यांचा स्वप्नातील महाराष्ट्र हाच आहे का? अवघ्या देशात पहिले आरक्षण महाराष्ट्रात लागू झाले. अहिल्याबाई होळकर यांनी देशात अनेक कामे केली. पण त्या लोकांनी कधी जात पाहिली नाही. कुणबी हे शेती करणारे आहे. आपले पोर शिकले पाहिजे. हे प्रत्येक आई-बापाचे स्वप्न असते. परंतु इतरांचे पोर शिकू नये, असे नको. आज राज्यात चिथावणी करणारे भाषणे होत आहे. हे थांबले पाहिजे. यातून दंगली घडल्या तर कोण जबाबदार? असे अजित पवार यांनी सुनावले.