मराठा आरक्षणाचा सर्वाधिक फटका एसटीला, अनेक ठिकाणी लालपरीची चाके थांबली
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या तीव्र आंदोलनामुळे बसेसचे नुकसान होत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला आगारातून जवळपास 132 रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे येवला आगाराचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे.
योगेश बोरेसे, पुणे | 2 नोव्हेंबर 2023 : राज्यात मराठा आंदोलन उग्र झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सर्वत्र साखळी उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. त्याचवेळी आंदोलकांकडून लालपरीला लक्ष केले जात आहे. यामुळे राज्य परिवाहन मंडळ पुन्हा आर्थिक गर्तेत अडकला आहे. कोरोनाकाळानंतर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन केले होते. त्यामुळे एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला होता. तो आता सुस्थितीत येत असताना पुन्हा मराठा आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांत एसटीचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एसटीला बसला आंदोलनाचा फटका
गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत होती. एसटीला चांगले दिवस येत होते. परंतु मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. त्याचा थेट फटका हा एसटी महामंडळाला बसला आहे. एसटी महामंडळाचे आतापर्यंत सुमारे १७ ते २० कोटींचे नुकसान झाले आहे.
येवला आगारातून अनेक फेऱ्या रद्द
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या तीव्र आंदोलनामुळे बसेसचे नुकसान होत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला आगारातून जवळपास 132 रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे येवला आगाराचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे.
मराठा आरक्षणाची तीव्रता वाढत असताना सर्वत्र एसटी बसेसवर जाळपोळ आणि दगडफेक होत आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये दोन दिवसांपासून एकही बस बाहेर पाठवली जात नाही. तसेच बस स्थानक बस येत नाही. यामुळे बस स्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे.
नागपूर विभागात मोठे नुकसान
नागपूरमध्ये मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. राज्यात गाड्यांची जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागपूर विभागाच्या मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस फक्त पुसदपर्यंत पाठविण्यात येत आहे. यामुळे नागपूर विभागाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.