तर महाराष्ट्रात गौतमी पाटील हिचे कार्यक्रम होऊ देणार नाही; कुणी दिला हा इशारा?
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील मोठ्या अडचणीत सापडली आहे. आता गौतमीच्या विरोधात मराठा संघटना एकवटली आहे. या संघटनेने गौतमी पाटील हिला कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा दिला आहे.
पुणे : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मागचं शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाहीये. आाधी गौतमी पाटीलच्या नृत्याला आक्षेप घेण्यात आला. त्यावर मराठी इंडस्ट्री ते लावणी कलाकारांपर्यंत अनेकांनी विरोध केला. तिचं नृत्य अश्लील असल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला. त्याबद्दल गौतमीने दिलगीरी व्यक्त केली. तिच्या नृत्यातही बदल केला. त्यानंतरही तिच्यावर टीका होतच होती. त्यानंतर गौतमीच्या मानधनावरून वाद झाला. खुद्द इंदोरीकर महाराजांनी तिच्या मानधनावरून तिच्यावर टीका केली. ते होत नाही तोच गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ कुणी तरी शूट करून व्हायरल केला. त्यामुळे गौतमीच्या पायाखालची वाळूच सरकली. पण तरीही तिने हिंमत हारली नाही. आता पुन्हा गौतमीच्या मागे आणि एक शुक्लकाष्ठ लागलं आहे. तिचा कार्यक्रमच होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा समन्वयक राजेंद्र जराड यांनी गौतमी पाटील हिला हा इशारा दिला आहे. गौतमी पाटील ही पाटील हे आडनाव लावून पाटलांची बदनामी करत असल्याचा आरोप राजेंद्र जराड यांनी केला आहे. गौतमी पाटील हिचं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. तिने गौतमी चाबुकस्वार हे आडनाव लावूनच कार्यक्रम करावेत. तिने पाटील आडनाव टाकावं. पाटील आडनाव लावून तिने कार्यक्रम केल्यास तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा राजेंद्र जराड यांनी दिला आहे. गौतमी पाटील हिने आडनाव बदलावं म्हणून पुण्यात एक बैठकही पार पडली. त्यात ही चर्चा करण्यात आली आहे.
गौतमी आज विरारमध्ये
दरम्यान, या सर्व प्रकरणावर गौतमी पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गौतमी पाटील हिचा आज विरारमध्ये कार्यक्रम आहे. सायंकाळी 7 वाजता तिचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यावेळी गौतमी मीडियाशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयोजकांवर गुन्हा
गौतमी पाटील हिचा परवा पुण्यातील भोसरी येथे कार्यक्रम पार पडला. अमित शंकर लांडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मयूर रानवडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच बर्थडे बॉयवरही गुन्हा दाखल केला. कोणतीही परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक चांगलेच अडचणीत आले आहेत.