मावळ, पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai-Pune express way) महामार्गावर शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास खंडाळा घाटात मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या शिवशाही बसला (Shivshahi bus) अचानक ही आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या बसमध्ये एकूण तीस प्रवासी असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. या अपघातामुळे काही काळ द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आग (Fire) नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही, मात्र आग लागताच चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. यादरम्यान सर्व प्रवासी बसच्या बाहेर पडले. वेळीच आग लागल्याचे लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळाली.
गेल्याच महिन्यात सांगलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर चालकाने ही बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बसमधील प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. अग्निशामक दलाच्या दोन गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. या बसमध्येही जवळपास 40 प्रवासी होते. हे सारे प्रवासी गाडीचे चालक शेरअली सिराज फकीर यांनी प्रसंगावधान दाखवल्याने बचावले. त्यानंतर नाशकातील निफाड तालुक्यातील बोकडदरे येथेही शिवशाही बसच्या आगीची घटना घडली. औरंगाबाद येथून ही गाडी नाशिककडे जात होती. मात्र, येवला तालुक्यातल्या देशमाने येथे ही गाडी अचानक बिघडली. बसमधून जवळपास दहा ते पंधरा प्रवासी प्रवास करत होते. मात्र, बस बंद पडल्याने त्यांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले होते. त्यानंतर बिघडलेल्या बसने पेट घेतला. आगीचे कारण सध्या स्पष्ट नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
#Pune : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिवशाही बसला अचानक आग लागली. यात बस खाक झाली असून सुदैवानं सर्व 30 प्रवासी वाचले आहेत. व्हिडिओ पाहा – #fire #shivshahibus #st pic.twitter.com/Lm38xRueN9
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 1, 2022
शिवशाही आग लागण्याच्या घटना जुन्याच आहेत आणि त्रुटी असतील तर त्या तत्काळ दूर करायला हव्यात, शिवशाही बसमध्ये काही दोष असतील अन्यथा हे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे होणार आहे. प्रत्येक वेळी आग लागलेली समजेल, असे नाही. एखादवेळी धोकाही होऊ शकतो. त्यावेळी प्रवाशांच्या जीवावर बेतल्यानंतर एसटी प्रशासन जागे होणार आहे का, असा सवाल यानिमित्ताने करण्यात येत आहे.