Pune News : पुणे शहरात म्हाडाच्या पाच हजार घरांची सोडत निघणार, पाहा कधीपासून सुरु होणार प्रक्रिया
Pune News : पुणे शहरात घर घेण्याची स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे शहरात म्हाडातर्फे पाच हजार घरांसाठी लॉटरी निघणार आहे. त्याची प्रक्रिया आता कधी सुरु होणार? यासंदर्भात माहिती मिळाली आहे.
पुणे | 17 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. यामुळे पुणे शहरातील घरांची मागणी सातत्याने वाढत आहे. मागणी जास्त असल्यामुळे घराचे दर वाढलेले असतात. परंतु आता पुणे शहरात घर कमी किंमतीत घेण्याची संधी मिळणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून ही संधी मिळणार आहे. म्हाडाकडून पाच हजार घराची सोडत काढण्यात येणार आहे. त्यासंदर्भात प्रक्रिया कधीपासून सुरु होणार आहे, यासंदर्भातील माहिती मिळाली आहे. नुकतेच भाजप आमदाराला मुंबईत म्हाडाचे घर लागले. त्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
कधीपासून होणार प्रक्रिया
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून नुकतीच ४,०८२ घरांची लॉटरी काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मंडळाची प्रक्रिया लवकरच सुरु करणार असल्याचे म्हटले होते. मुंबईतील म्हाडाच्या लॉटरीत जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण कुचे यांनाही घर मिळाले. दहा कोटींचे घर त्यांना म्हाडाकडून 7 कोटी 52 लाख 61 हजार 631 रुपयांना मिळाले. मुंबईनंतर आता पुण्यात पाच हजार घरांची सोडत निघणार आहे. यासाठी २५ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरु होईल.
गटानुसार करता येणार अर्ज
पुणे म्हाडासाठी विविध गट असणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च असे गट असतील. पुणे शहरासह सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरसाठी सोडत निघणार आहे, अशी माहिती पुणे म्हाडा मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.
म्हाडाकडून मिळतात कमी किंमतीत घरे
म्हाडाकडून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी किंमतीत घरे मिळतात. यामुळे हजारो जण यासाठी अर्ज करतात. म्हाडाची जाहिरात कधी निघणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. लॉटरी पद्धतीने घरांची सोडत काढली जाते.
हे ही वाचा
mhada flat lottery : आमदाराला लागले म्हाडाचे घर, केंद्रीय मंत्री वेटींगवर, घराची किंमत तरी काय?