मोठी बातमी! छगन भुजबळ यांचा अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा?
"नाभिक समाजावर सुद्धा, त्यांनी तुळशी गावात मतदान केलं नाही म्हणून उद्ध्वस्त केलं. मगाशी इथे डॉक्टर यादव आले होते. त्यांच्या फलटण येथील हॉस्पिटलची तोडफोड केली. पेशंट्सना पळवून नेलं. त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आला. हे काय चाललं आहे? राज्यात कायदा व्यवस्था नाही. कायदा, सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कुणाची?", असा सवाल छगन भुजबळांनी केला.
पुणे | 9 डिसेंबर 2023 : पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे आज ओबीसी एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. या सभेत छगन भुजबळ यांनी धडाकेबाज भाषण केलं. त्यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम आणि नियंत्रणात ठेवण्याचं काम गृह विभाग करतं. पण भुजबळांनी त्याचबाबत सवाल उपस्थित केले. यावेळी त्यांनी काही घटनांचं उदाहण देत पोलिसांकडून कारवाई केली जात नाही, असं म्हटलं. राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
“राहत्याला पिंपरी निर्मळमध्ये गावात दोन दलित कुटुंब आहेत. त्यांनी कुणीतरी घोरपडे म्हणून त्यांना मतदान केलं नाही म्हणून त्यांच्या घरावर 400 ते 500 लोकं आली. मारहाण केली, घर उद्ध्वस्त केलं. लहान मुलगी तिच्या बोबड्या भाषेत सांगत होती की, तिला दगडावर फेकलं. 71 लोकांवर केस घेतली असं म्हणाले. कालपर्यंत कोणावरही अटक झाली नव्हती”, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
‘हे काय चाललं आहे?’
“नाभिक समाजावर सुद्धा, त्यांनी तुळशी गावात मतदान केलं नाही म्हणून उद्ध्वस्त केलं. मगाशी इथे डॉक्टर यादव आले होते. त्यांच्या फलटण येथील हॉस्पिटलची तोडफोड केली. पेशंट्सना पळवून नेलं. त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आला. हे काय चाललं आहे? राज्यात कायदा व्यवस्था नाही. कायदा, सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कुणाची?”, असा सवाल छगन भुजबळांनी केला.
“मी मागेच सांगितलं होतं, जरांगे जिथे उपोषणाला बसले, लाठीहल्ला झाले, तिथे पोलीस त्यांना हॉस्पिटला घेऊन जाण्यासाठी न्यायला आले तेव्हा ते म्हणाले मी आराम करतो. सकाळी या. त्यानंतर सकाळी पोलीस आले. त्यामध्ये महिला पोलीसही होते. कारण तिथे उपोषणाला महिलाही बसल्या होत्या. त्यांना फक्त म्हणाले की, चला. चला म्हटल्यानंतर लगेच रात्रीत जेवढे दगड, धोंडे जमा केले होते त्याचा मारा पोलिसांवर केला”, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.
भुजबळांनी फडणवीसांच्या लेखी उत्तराचा दाखला वाचला
“पोलीस जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये गेले. महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी बचावासाठी लाठीहल्ला केला. हे मी दोन महिने बोलतोय, पण कोणी बोलायला तयार नाही”, असं भुजबळ म्हणाले. “विधानसभेत काल देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं. जमाव हिंसक झाला, एक-दोन नव्हे, 79 पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले, आणि मग पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने वाजवी बळाचा वापर केल्यामुळे 50 आंदोलक जखमी झाले”, असा दावा छगन भुजबळांनी केला.
“आता ही बाजू त्याचवेळेस पुढे यायला पाहिजे होती. तरीही त्याला एवढी सहानुभूती मिळाली नसती. पण एकच बाजू दाखवली जात होती. एवढंच नाही. नांदेड जिल्ह्यात कृष्णपूर येथे नांदेड-बंगळुरु राज्यमार्गावर आंदोलनाला हिंसक वळण, पोलीस अधिकारी जखमी, बीडमध्ये पोलीस जखमी. मला सांगा या राज्यात अशांतता कोण माजवतंय? छगन भुजबळ बोलला की, आम्ही तलवारी घेऊ? ते बोलत आहेत”, असं छगन भुजबळ म्हणाले.