आमदार रवींद्र धंगेकर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे पब आणि बारवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी देखील आता यावरुन पोलिसांविरोधात आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला आहे.
पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. पुण्यातील बेकायदेशीर पब आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत, धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आधी आंदोलन केलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंचा फोटो असलेल्या एका खोक्यावर 50 खोके, असं लिहिण्यात आलं आणि हातात 500 रुपयांच्या बनावट नोटा घेवून घोषणा दिल्या. हाच पैशांचा खोका घेवून धंगेकर आणि अंधारे, पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागात शिरले आणि उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त चरणसिंग राजपूत यांच्यावर भडकले.
धंगेकरांचा वसुलीचा आरोप
हफ्ते घेवून बेकायदेशीर बार आणि पब सुरु असल्याचा आरोप धंगेकरांनी केला. सुषमा अंधारेंनी तर कोणत्या बार आणि पब कडून किती पैसे घेतले जातात, त्याची यादीच वाचून दाखवली. तर चरणसिंग राजपूत यांनी वसुलीचे आरोप फेटाळले असून, अशी कुठं वसूली होत असेल तर चौकशी करणार असल्याचं म्हटलंय आहे.
धंगेकर आणि अंधारेंनी 48 तासांचा वेळ पुण्यातल्या उत्पादन शुल्क विभागाला दिलाय. 48 तासांत बेकायदेशीर पब आणि बारवर कारवाई न झाल्यास, बुल्डोझर चालवण्याचा इशारा अंधारेंनी दिला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी धंगेकरांचा स्टंट असून, माझ्या फोटोचा वापर करुन 50 खोके असं लिहून बदनामी केल्याचं म्हटलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आमदार धंगेकरांविरोधात तक्रारीची तयारीही केली आहे.
पुण्यातल्या अपघातानंतर बेकायदेशीर बार पबकडे धंगेकर आणि अंधारेंनी मोर्चा वळवलाय. वसुलीची यादी आणि वसुलीचा रेटही त्यांनी समोर आणला आहे.
प्रशासनाकडून कारवाई
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पब आणि बार मालकांचे धाबे दणालले आहे. या अपघात प्रकरणानंतरच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये धडक मोहिमेत शहरातील तसेच जिल्ह्यातील 49 पब आणि बार वर कारवाई करण्यात आली होती. तसेच संबंधितांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर बेकायदेशीर पब आणि बारचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुण्यात काही दिवसांपासून प्रशासनाने पब आणि बारवर कारवाई सुरु केली आहे. पुण्यातील पब संस्कृती विरोधात मनसेने देखील आंदोलन केले होते. एक सही संतापाची अशी मोहिम मनसेने राबवली होती.