आमदार राम शिंदे, रोहित पवार यांच्यात वाद पेटला, रोहित पवार यांनी लिहिले मोदी यांना पत्र
Mla rohit pawar and ram shinde : भारतीय जनता पक्षाचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. दोन्ही आमदारांनी श्रेयवादाच्या लढाईसाठी एकमेकांवर टीका केली आहे. काय आहेत आरोप...
कुणाल जायकर, अहमदनगर | 11 ऑगस्ट 2023 : भारतीय जनता पक्षाचे आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील वाद रंगला आहे. श्रेयवादावरुन ही लढाई सुरु झाली आहे. एमआयडीसी आणि एसटी डेपोवरुन हा वाद सुरु आहे. आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ही नौटंकी बंद केली पाहिजे, असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवार यांना दिला. रोहित पवार यांनी दोन एकरमध्ये घर बांधले, यावरही चर्चा व्हावी, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.
काय आहे नेमका वाद
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड एमआयडीसीवरून दोन आमदारांमध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे. राम एमआयडीसी संदर्भात रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना पत्र लिहिले. त्यानंतर राम शिंदे यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. रोहित पवार ज्या एमआयडीसीसाठी प्रयत्न करत आहेत, ती जागा नीरव मोदी याची आहे. त्या जमिनीचे हिडान पार्टनर कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे, असा टोला राम शिंदे यांनी लगावला आहे.
घरावरुन टीका
आमदार राम शिंदे म्हणाले की, 2019 मध्ये माझ्या घराबाबत खूप मोठा इश्यू केला होता. माझे घर 2000 स्क्वेअर फूटमध्ये बांधले होते. परंतु आता रोहित पवार यांनी दोन एकरमध्ये घर बांधले, त्यावर रोहित पवार यांनी उत्तर द्यावे, असे राम शिंदे यांनी म्हटले.
कारखाना विकत घेतला पण…
हळगाव साखर कारखाना आमदार रोहित पवार यांनी विकत घेतला. परंतु कारखान्यातील सर्व लोकांना कामावरुन काढून टाकल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला. त्यावर आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. कारखान्यातील 95 टक्के लोक हे स्थानिक असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
एसटीडेपोवरुन जुंपली
कर्जत एसटीडीपीवरून दोन्ही आमदारांमध्ये वाकयुद्ध रंगले. राम शिंदे यांनी एसटी डेपो आणू, अशी घोषणा केली होती. परंतु मंत्री पदाचे पाच वर्षे निघून गेली. त्यानंतर डेपो आला नाही. मी सहा महिन्यांतच एसटी डेपो मंजूर करुन आणला. माझ्या काळात मतदार संघात अनेक विकास कामे झाली आहे. कोट्यवधीचा निधी आला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.