पुणे : मनसेने राज्यात दोन हजार वकिलांची (Lawyers) फौज तयार ठेवली आहे. येत्या काळात कायदेशीर संघर्षाला तोंड देण्यासाठी ही वकिलांची टीम तयार करण्यात आली आहे. तीन तारखेच्या भोंग्याच्या अल्टीमेटमनंतर मनसे (MNS) आक्रमक होणार असे दिसत आहे. राज्यात कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास पक्षाकडून वकील दिले जातील, हेच यातून दिसून येत आहे. राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) महाराष्ट्र दिनी (1 मे) सभा होत आहे. हिंदुत्व, भोंगे या भूमिकेमुळे सध्या ही सभा चर्चेत आहे. राज ठाकरे पुण्यातून औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. तत्पूर्वी पुरोहित वर्गाकडून त्यांना आशीर्वाद देण्यात आले. मंत्रोच्चार पठण करत राज ठाकरेंना आशीर्वाद देण्यात आले. त्यांच्यावर यावेळी पुष्पवृष्टीही करण्यात आली. दरम्यान, औरंगाबादमधील सभेत कायदा-सुव्यवस्था निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक संघटनांनी या सभेला विरोध केला होता.
राज ठाकरेंनी कायदा सुव्यवस्था मोडल्यास त्यांची सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मीतर्फे देण्यात आला होता. पोलिसांनी राज ठाकरेंना काही अटी घालून दिल्या आहेत. या अटींचे उल्लंघन झाल्यास पोलीस तर कारवाई करतीलच. मात्र सभास्थळीच आम्ही महापुरुषांचा जयघोष करत सभा उधळून लावू, असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विविध संघटनांसह वचिंत बहुजन आघाडीही राज ठाकरेंच्या सभेविरोधात आक्रमक झाली आहे. राज ठाकरेंच्या सभेदिवशीच औरंगाबाद शहरात वंचित बहुजन आघाडीचा शांती मार्च काढणार असल्याची माहिती समोर आल्याने आता पुन्हा नवे ट्विस्ट आले आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे शांती मोर्चाच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले गेले असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच शहरातील क्रांती चौक ते पैठण गेट, महात्मा फुले पुतळा, औरंगपुरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत शांती मार्चसाठी त्यांनी परवानगी मागिलती असल्याचेही कळते आहे. या सर्व विरोधाच्या पार्श्वभूमीवर मनसे काय भूमिका घेते हे लवकरच समोर येईल.