Loudspeaker row : ‘…नाहीतर पोलीस चौकीसमोर हनुमान चालिसा म्हणणार’; मनसेच्या हेमंत संभूस यांचा पुण्यात इशारा
आम्हाला समाजात तेढ निर्माण करायची नाही, त्यामुळेच पोलिसांना पत्र दिले, असा दावा हेमंत संभूस यांनी केला आहे. लाऊडस्पीकर बंद असल्याबाबत आम्हाला खात्री द्यावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा हेमंत संभूस यांनी दिला आहे.
पुणे : मशिदींवरील भोंगे (Loudspeaker) उतरवण्याची ग्वाही द्या, नाहीतर आम्ही मशिदींसमोरच हनुमान चालिसा वाचवणार, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस (Hemant Sambhus) यांनी याबाबत माहिती दिली. याविषयी पोलिसांना निवेदनही देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये मशिदींतील लाऊडस्पीकर काढल्यानंतर ते रस्त्यावर ठेवा, असे म्हटले आहे. मौलानांचे संमतीपत्र घ्या अन्यथा मनसे पोलीस ठाण्यासमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa)वाजवून निषेध नोंदवेल. एकावेळच्या अजानचा विषय नाही, पाचवेळा अजान होते. भोंगे बंद अवस्थेत असतील तर तशास्वरुपाचे स्पष्टीकरण मशिदींकडून पोलिसांनी घ्यावे, अन्यथा आंदोलन करू. कितीही नोटीस दिली, तरी आम्ही घाबरणार नाही, असेही ते म्हणाले.
‘मनसे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम’
कायदा सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा न वाजवण्याचे आवाहन पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना केले होते. त्याविषयी नोटीसही पाठवण्यात आल्या होत्या. मात्र मनसे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आमचे कॅप्टन म्हणजेच शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे सर्व आंदोलनाचे नेतृत्व करत होते. संवाद साधत होते. आम्हाला समाजात तेढ निर्माण करायची नाही, त्यामुळेच हे पत्र दिले, असा दावा संभूस यांनी केला आहे. याबाबत आम्हाला खात्री द्यावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा हेमंत संभूस यांनी दिला आहे.
‘सर्वच मशिदींमधील लाऊडस्पीकर अनधिकृत’
पुणे मनसेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की लाउडस्पीकर ही सामाजिक समस्या आहे आणि आम्हाला धार्मिक तेढ निर्माण करायची नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. संपूर्ण पुणे शहरात सुमारे 400 ते 450 मशिदी आहेत, जवळपास सर्वच मशिदींमध्ये लाऊडस्पीकर आहेत, जे अनधिकृत आहेत. लाऊडस्पीकर कायमचे काढून टाकावेत किंवा बंद करावेत जेणेकरून आजूबाजूला राहणार्या नागरिकांना त्यातून निघणाऱ्या मोठ्या आवाजाचा त्रास होणार नाही.
‘…तर सामाजिक तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच’
पत्रात पुढे म्हटले आहे, की आम्ही अजानच्या विरोधात नाही, पण आम्हाला एवढेच सांगायचे आहे, की लाऊडस्पीकरवरून असे करू नये. या सर्व मशिदींच्या मौलवींशी बोलून लेखी अहवाल पोलिसांना द्यावा. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याचीही पोलिसांनी दक्षता घ्यावी. मशिदींमधून लाऊडस्पीकरवर अजान वाजवली जाणार नाही, असा संदेश या अहवालातून निघायला हवा. तशी मागणीही राज ठाकरेंनी केली आहे. मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवल्यास धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही आणि मौलवी आमच्यासोबत कायद्याचे पालन करतील, असेही पत्राद्वारे म्हटले आहे.