Pune MNS : मनसेतला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, वसंत मोरेंचे समर्थक निलेश माझिरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’
निलेश माझिरे हे पक्षांतर्गत गटबाजी आणि वादामुळे पक्षाला रामराम ठोकणार आहेत. त्यांनी शिवसेनेचे संपर्कनेते सचिन अहिर यांची भेट घेतली असून ते दोन दिवसांत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
पुणे : पुणे मनसेतला (Pune MNS) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मागील काही दिवसांपासून मनसेत कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा ऐकत असताना आता त्यात आणखी एका वादाची भर पडली आहे. पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे (Nilesh Mazire) मनसे सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 22 मेरोजी पुण्यात सभा होणार आहे. त्याची तयारीही सुरू झाली आहे. तर ते येण्याच्या आधीच मनसेत गळती सुरू झाली आहे. निलेश माझिरे मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांचे ते कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात. ते पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष होते. पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी यामुळे निलेश माझिरे पक्षाला रामराम ठोकणार आहेत. दरम्यान, त्यांनी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर यांची भेट घेतली.
मनसेत खळबळ
निलेश माझिरे हे पक्षांतर्गत गटबाजी आणि वादामुळे पक्षाला रामराम ठोकणार आहेत. त्यांनी शिवसेनेचे संपर्कनेते सचिन अहिर यांची भेट घेतली असून ते दोन दिवसांत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान वसंत मोरे यांचे अनेक कट्टर समर्थक शिवसेनेत जाऊ लागल्याने मनसेत मात्र खळबळ उडाली आहे. वसंत मोरे हे मात्र अद्याप राजमार्गावरच असल्याचे समजते.
काय बोलणार राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी तब्येतीच्या कारणावरून दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर ते आता पुण्यात 22 मे रोजी सभा घेणार आहेत. त्याआधीच कट्टर कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे राज ठाकरे हे 5 जूनला आयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांनी आयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला आहे. त्यानंतर पुण्यातील रविवारच्या सभेत आयोध्या दौऱ्यावर तसेच मागील काही दिवसांतील पुण्यातील मनसेतील अंतर्गत दुफळीवर राज ठाकरे काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.