Raj Thackeray: राज ठाकरेंच्या तीन सभा मैदानात, पुण्यातीलच सभा बंदिस्त सभागृहात का?; मनसे नेत्याने सांगितलं नेमकं कारण
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभे करता आम्ही 4 ठिकाणांच्या परवानग्या मागितल्या होत्या. त्यापैकी तीन ठिकाणांच्या परवानग्या मिळाल्या होत्या. त्यातील दोन ठिकाणं ही ओपन स्पेसमधली होती आणि एक हे गणेश कला क्रीडा मंच होता.
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. राज ठाकरे नेमकं काय बोलतात? कुणाची पोलखोल करतात आणि अयोध्या (ayodhya) दौऱ्याबाबत काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांची ही गेल्या काही दिवसातील चौथी सभा आहे. मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद नंतरची ही सभा आहे. त्यामुळे या सभेलाही राज्यभरातून मनसैनिक (mns) दाखल झाले आहेत. खासकरून पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील मनसैनिक या सभेला मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. मात्र, आधीच्या तिन्ही सभा खुल्या मैदानात झाल्या होत्या. मात्र, पुण्यातील सभा बंदिस्त सभागृहात होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राज ठाकरेंच्या सभे करता आम्ही 4 ठिकाणांच्या परवानग्या मागितल्या होत्या. त्यापैकी तीन ठिकाणांच्या परवानग्या मिळाल्या होत्या. त्यातील दोन ठिकाणं ही ओपन स्पेसमधली होती आणि एक हे गणेश कला क्रीडा मंच होता. आज राज ठाकरे हे अनेक विषयांवर बोलतील आणि लोकांच्या मनाला भिडेल अशा गोष्टींवर भाष्य करतील. राज ठाकरे यांच्या अगोदर चार नेते हे भाषण करतील, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.
राज ठाकरेंच्या सभेची संपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी लाईव्ह ब्लॉगच्या लिंकवर क्लिक करा
नेमकं कारण काय?
पोलिसांनी तीन ठिकाणी सभा घेण्याच्या परवानग्या दिल्या होत्या. त्यातील दोन ठिकाणं खुली मैदाने होती. तर एक बंदिस्त सभागृह होतं. तरीही मनसेने बंदिस्त सभागृहाची निवड केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी भाष्य केलं आहे. हवामानामुले आम्ही बंदिस्त सभागृहात सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पाऊस आला असता तर सर्वांना त्रास झाला असता. तो टाळण्यासाठी आम्ही बंदिस्त सभागृहात सभा घेण्याचं ठरवलं, असं नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे तुमच्याप्रमाणे आम्हालाही उत्सुकता आहे. राज ठाकरे आज सर्वच प्रश्नांना उत्तरं देणार. आम्ही कुणाच्या टीकेला उत्तरं देत नाही, आम्ही आमचं काम करतोय, असंही सरदेसाई यांनी सांगितलं.
वसंत मोरेंची टू व्हिलर रॅली
सभेसाठी पुण्यातील बाईक रॅली काढली जात आहे. मनसे नेते वसंत मोरे निवासस्थानावरुन मोरेबागेतील कार्यालयात पोहोचले. ते कार्यालयातून कार्यकर्त्यांसह टू व्हिलर रॅलीने सभा स्थळी जात आहेत. त्यांच्या या रॅलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून काही वेळातच ते सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत.
दौरा रद्द नाही, स्थगित
सगळ्या आरोपांना राज ठाकरे उत्तर देतील. अयोध्या दौरा रद्द केला नाही. तो तूर्तास स्थगित केलाय. राज ठाकरेंच्या सभेकडे सगळ्यांच लक्ष लागलंय. ते अयोध्या दौऱ्यावर भाष्य करतीलच, असं मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलं. दरम्यान, अयोध्या तो जा के रहेंगे च्या घोषणा देत मनसैनिक सभागृह आवारात दाखल झाले आहेत. सभागृहात येणाऱ्या प्रत्येक मनसैनिकाची कसून तपासणी केली जात आहे.