ऊल ऊल उलघाल… ब्रँड तयार करायचा म्हटलं की स्वतः झिजाव लागतं…, मनसे नेते वसंत मोरे बनवताहेत चक्क चहा
वसंत मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांचा चहा बनवतानाचा एक फक्कड व्हिडीओ शेअर केला आहे. अवघ्या 37 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत वसंत मोरे खास चहा बनवताना दिसत आहेत.
पुणे : मनसे नेते वसंत मोरे हे नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असतात. कधी पक्षात दुजाभाव वागणूक दिल्याने चर्चेत असतात, कधी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर टीका केल्याने चर्चेत असतात, तर कधी कार्यकर्ते, मतदार आणि गरीबांना मदतीला धावून आल्यावरही चर्चेत असतात. वसंत मोरे आणि चर्चा हे जणू समीकरणच झालं आहे. मनसेचे ते पुण्यातील प्रभावी नेते असल्याने त्यांच्या प्रत्येक कृतीची चर्चा होत असते. आता ते आणखी एका कारणाने चर्चेत आले आहेत. चर्चा राजकीय नाही. पण चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांचा चक्क टपरीवर चहा बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरचं कॅप्शनही जोरदार आहे. त्यामुळे वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या या व्हिडीओची सध्या पुण्यात जोरदार चर्चा आहे.
वसंत मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांचा चहा बनवतानाचा एक फक्कड व्हिडीओ शेअर केला आहे. अवघ्या 37 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत वसंत मोरे खास चहा बनवताना दिसत आहेत. चहापत्ती, साखर टाकल्यानंतर त्यात अद्रक किसून टाकताना दिसत आहेत. नंतर वाफळलेला चहा हिसळून घेताना दिसत आहेत. वसंत मोरे यांच्या या व्हिडीओला 26 हजार लोकांनी लाइक केलं आहे. त्यावर 13 लोकांनी कमेंट केल्या आहेत. तर 5 लाख 44 हजार लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे.
ऊल ऊल उलघाल…
या व्हिडीओवर मोरे यांनी मुळशी पॅटर्न या मराठी सिनेमाचं गाणं बॅकग्राऊंडला दिलं आहे. ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल… वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमलsss ऊन ऊन व्हटातून… गुलाबी धांदल… वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल… असे या गीताचे बोल आहेत.
मग येताय ना चहा, नाष्टा…
ब्रँड तयार करायचा म्हटलं ना की स्वतः झिजाव लागतं… #mount88 ला स्पेशल चहा बनवला… मग येताय ना चहा नाष्टा आणि REDDY’S TANDOOR ची तंदूर खायला…बोपदेव घाट संपला की फक्त 5 मिनिटांवर भिवरी बोपगाव, सासवड रोड, अशी कॅप्शन वसंत मोरे यांनी या व्हिडीओला दिली आहे.
कोण आहेत वसंत मोरे?
वसंत मोरे हे मनसेचे पुण्यातील महत्त्वाचे नेते आहेत. पुण्यातील ज्येष्ठ नगरसेवक आहेत. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत नेते आहेत. कात्रजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण घेतलेलं आहे. तर शाहू मंदिरातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. वसंत मोरे व्यावसायिक आणि शेतकरी आहेत.
वसंत मोरे हे पूर्वीश्रमीचे शिवसैनिक आहेत. गेली 27 वर्षापासून ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. त्यामुळे वसंत मोरेही मनसेत आले. मनसेचे ते सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत.
त्यानंतर झालेल्या 2007च्या पुणे महापालिका निवडणुकीत मनसेचे 8 नगरसेवक निवडून आले होते. त्यात वसंत मोरेही होते. विशेष म्हणजे वसंत मोरे यांच्या मेहनतीमुळे हे नगरसेवक निवडून आले होते. वसंत मोरे यांनी पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिलं आहे.