अरे, भाभी तुम्हारे यहाँ भी नगरसेवक है, वो काम नही करते क्या?; मनसे नेते वसंत मोरे यांची ती पोस्ट का होतेय व्हायरल?
वसंत मोरे यांनी फेसबुकवर ही पोस्ट शेअर करताना त्यासोबत चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोत बुरखा घातलेल्या काही महिला आणि मुस्लिम पुरुष वसंत मोरे यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत.
पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांची सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. काही मुस्लिम महिलांनी त्यांच्या मतदारसंघातील कामानिमित्ताने वसंत मोरे यांची भेट घेतली होती. या महिला मोरे यांच्या मतदारसंघातील नव्हत्या. तरीही त्या वसंत मोरे यांच्याकडे आपली कैफियत घेऊन आल्या. यावेळी मोरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी या महिलांनी तुम्ही आम्हाला भावासारखे आहात. म्हणूनच आम्ही तुमच्याकडे विश्वासाने आलोय, असं सांगितलं. मोरे यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अन् माझ्या कपाळावरील भगव्याची त्यांना अडचण नाही तर मला बुरखा आणि टोपीची अडचण का असावी? असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे. वसंत मोरे यांची ही पोस्ट सध्या भलतीच चर्चेत आहे.
वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
कधी कधी मी निरपेक्षपणे वर्णभेद, जात-पात, श्रीमंतगरीब हा कोणताही फरक न पाहता सर्वसामान्य जनतेची कामे करतो. तेव्हा खूप समाधान वाटते, पुण्याच्या विविध भागातून लोक माझ्याकडे समस्या घेवून येतात. मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी तर काही प्रभागात मुस्लिम नगरसेवक असतानाही तिकडचे मुस्लिम बंधू भगिनी माझ्याकडे येतात.
मी त्यांना सहजच विचारतो अरे, भाभी तुम्हारे यहाँ भी नगरसेवक है, वो काम नही करते क्या? तेव्हा आपसूक त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर येतात, आप हमे बडे भाई के माफिक लगते हो. आणि मग मनात एक विचार येतो, जर यांना माझ्या कपाळावरील भगव्याची अडचण नाही तर मला बुरखा आणि टोपीची अडचण का असावी?, असा सवाल वसंत मोरे यांनी या पोस्टमधून केला आहे.
फोटोही शेअर
वसंत मोरे यांनी फेसबुकवर ही पोस्ट शेअर करताना त्यासोबत चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोत बुरखा घातलेल्या काही महिला आणि मुस्लिम पुरुष वसंत मोरे यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत. विभागातील समस्या या महिला मांडताना दिसत आहेत. तर या कामासंदर्भात मोरे कुणाशी तरी फोनवरून चर्चा करताना दिसत आहेत. मोरे यांच्या या पोस्टला हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.
पुन्हा चर्चेत
वसंत मोरे नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असतात. मागच्यावेळी त्यांनी एका टपरीवर चक्क चहा बनवला होता. त्याचा व्हिडीओही शेअर केला होता. त्यामुळे वसंत मोरे यांच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा झाली होती. पुण्यात कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही महिला कोयता घेऊन गवत कापायला जात असतानाचे फोटो वसंत मोरे यांनी शेअर केले होते. त्याचीही अशीच चर्चा रंगली होती.