पुणे | 12 नोव्हेंबर 2023 : पुणे येथील मनसे नेते वसंत मोरे नेहमीच चर्चेत असतात. कोरोना काळात त्यांनी पुणेकरांना केलेली मदत पुणेकरांसाठी लाख मोरांची ठरली. यामुळे अनेक छोट्यामोठ्या गोष्टींसाठी पुणे शहरातील सर्वसामान्य व्यक्ती त्यांना संपर्क करतो. मग वसंत मोरे खास मनसे स्टाईलने इशारा देतात आणि काम फत्ते होते. सोशल मीडियाची ‘पावर’ त्यांना चांगली माहीत आहे. यामुळे त्यामाध्यमातूनही ते नेहमी सक्रीय असतात. आता वसंत मोरे यांनी पुन्हा एकादा सोशल मीडियाचा वापर केला आहे. त्यात त्यांनी आमची पोरं फटाके विकत आहे, गांजा नाही…आमची दिवाळी नीट झाली नाही तर तुमचा रोज शिमगा होईल…असा थेट इशारा पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. अतिक्रमणे वाले एवढे मागतात…,पोलीस तेवढे मागतात…,ट्रॅफिक वाले एवढे मागतात…अशा तक्रारी आल्यानंतर वसंत मोरे यांनी हा इशारा दिला.
वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्या माध्यमातून रस्त्यावर दिवाळीचा व्यवसाय करणाऱ्यांची व्यथा मांडली आहे. “आयका ना साहेब…. (अतिक्रमणवाले आणि पोलिस)” या शिषर्काखाली वसंत मोरे यांनी पोस्ट लिहिली. त्यात वसंत मोरे यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे यापूर्वीच सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे. अजून ते पूर्णपणे त्यातून सावरले नाही. दिवाळी वर्षातून एकदाच येते. परंतु राज्य सरकार अस्थिर असल्यामुळे कोणाचाच कोणाला मागमूस राहिला नाही. यामुळे सामान्य जनतेकडे कोणाचेच लक्ष नाही. दिवाळीत चार दिवस आमची तरुण पोरं रस्त्याच्या कडेला कोणाला अडचण होणार नाही याची काळजी घेऊन फटाक्यांचे स्टॉल लावून बसलेले आहेत. या पोरांना व्याजाने पैसे आणून चार पैसे मिळतील, या आशेने हे स्टॉल लावले आहे.
वसंत मोरे यांच्याकडे या मुलांनी तक्रारी केल्या. अतिक्रमण वाले, पोलीसवाले, ट्रॅफिक वाले पैसे मागतात…त्यावर वसंत मोरे संतापले. त्यांनी सरळ इशारा दिला. अरे आमची पोर फटाके विकत आहेत, गांजा नाही. पोरांना धंदे करू द्या…त्यांची दिवाळी ४ दिवसांचीच आहे…तुमची दिवाळी उरलेले ३६१ दिवस चालते…आमची दिवाळी नीट झाली नाही तर तुमचा रोज शिमगा होईल… नाहीतर एका दिवसात सगळे लाईव्ह घेऊन कोणी किती घेतले ते जाहीरपणे सांगावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
वसंत मोरे यांनी फेसबुकवर केलेल्या या पोस्टला अनेकांनी शेअर केले आहे. १२५ पेक्षा जास्त जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. हजारो जणांना लाईक केले आहे. अनेकांनी कॉमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नाद करा… पण तात्यांचा नाही. दुसरा युजरने म्हटले आहे की, खरं आहे साहेब…त्यांना म्हणा हद्दीत रहा नाहीतर रद्दीत जाल. आणखी एक युजरने म्हटले आहे की, पुणे रेल्वे स्टेशन परिसरात परराज्यातील लोक टपरीमध्ये खुलेआम गोवा गुटखा विकत आहे. पण आपल्या मराठी लोकांनी काय केले तर त्यांना त्रास दिला जातो. एकंदरीत वसंत मोरे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.