VIDEO | अहो आश्चर्यम! बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत राज ठाकरे चक्क मास्कमध्ये

| Updated on: Jul 21, 2021 | 8:52 AM

राज ठाकरे कोरोनासंबंधी नियम पायदळी तुडवत विनामास्क फिरताना दिसतात. मी मास्क लावणार नाही, हा त्यांचा अट्टाहास याआधीही पाहायला मिळाला आहे.

VIDEO | अहो आश्चर्यम! बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत राज ठाकरे चक्क मास्कमध्ये
राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीला
Follow us on

पुणे : पुणे दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांची भेट घेतली. संपूर्ण दौऱ्यात विनामास्क दिसलेले राज ठाकरे बाबासाहेबांच्या भेटीवेळी मात्र मास्क घालून होते. त्यामुळे दोघांच्या भेटीसोबतच राज ठाकरेंनी घातलेल्या मास्कचीही सर्वत्र चर्चा रंगली होती.

राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुण्यातील पर्वती परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी मंगळवारी राज ठाकरेंनी ही भेट घेतली. बाबासाहेब पुरंदरे पुढच्याच आठवड्यात वयाची 99 वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचं वयोमान आणि संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज ठाकरेंनी मास्क लावत काळजी घेतल्याचं दिसतं.

पाहा व्हिडीओ

विनामास्क राज ठाकरे

राज ठाकरे कोरोनासंबंधी नियम पायदळी तुडवत विनामास्क फिरताना दिसतात. मी मास्क लावणार नाही, हा त्यांचा अट्टाहास याआधीही पाहायला मिळाला आहे. मार्च महिन्यात नाशिक दौऱ्यात त्यांनी मनसेचे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही मास्क हटवण्यास सांगितल्याने आश्चर्य व्यक्त गेलं होतं.

‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हता. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘त्यांना माझा नमस्कार सांगा,’ असे उत्तर दिले होते.

राज ठाकरेंकडून नियमांची पायमल्ली

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. अगदी मंत्रालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही राज विनामास्कच गेले होते. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते.

राज ठाकरेंच्या मॅरेथॉन बैठका

दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा सुरु आहे. दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून राज ठाकरे मॅरेथॉन बैठका घेत आहे. मोठ्या उत्साहात राज ठाकरे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली जात आहे.

मनसे शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफर

दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या:

चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो; राज ठाकरेंची शाखाध्यक्षांना भन्नाट ऑफर

राज ठाकरेंनी पुण्यात घोषणा केलेले मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक कसे असेल?

VIDEO | राज ठाकरे विनामास्क नाशकात, मास्क काढ, माजी महापौरांना सूचना

(MNS President Raj Thackeray meets Shivsahir Babasaheb Purandare in Pune tour wears mask)