मुंबई : पुणे महापालिका (pune corporation) जिंकण्यासाठी मनसेने (mns) कंबर कसली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी चार महिन्यांपूर्वी पुण्याचे सातत्याने दौरे केले होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच राज यांनी पक्षांतर्गत फेरबदलही केले होते. आता पुणे महापालिका जिंकण्यासाठी राज ठाकरे यांनी नवा नारा दिला आहे. लढायचं ते जिंकण्यासाठीच हा नारा मनसेकडून देण्यात आला आहे. येत्या 9 मार्च रोजी मनसेचा 16 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात राज यांची सभा पार पडणार आहे. या सभेतूनच लढायचं ते जिंकण्यासाठी हा नारा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर होत आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 7 ते 10 मार्च पर्यंत पुणे दौऱ्यावर आहेत. 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन असल्याने पुण्यातच हा सोहळा पार पडणार आहे. पुण्यातील स्वारगेट येथे नेहरू स्टेडियम जवळील गणेश कला क्रीडा केंद्रावर वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी मनसेने पोस्टर्स तयार केले आहेत. या पोस्टर्सवर लढायचं ते जिंकण्यासाठीच असा नवा नारा छापण्यात आला आहे. त्यामुळे मनसेच्याया नव्या नाऱ्याला पुणेकर कशी दाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, मनसेच्या वाटचालीत वर्धापन दिनाच्या जाहिरातीवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्याबरोबर अमित ठाकरे यांचे छायाचित्र झळकले आहे. अमित ठाकरे हे मनसेमध्ये अधिकच सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडे नाशिकचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून अमित ठाकरे यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमित यांना मनसेची नवी जबाबदारी मिळाल्यानंतर पोस्टरवर पहिल्यांदाच त्यांचा फोटो झळकला आहे. या पोस्टरवर मनसेचं निवडणूक चिन्ह, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचेच फोटो आहेत. त्यामुळे आता अमित ठाकरे वर्धापन दिनाच्या रॅलीला संबोधित करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुण्यापाठोपाठ राज ठाकरे यांनी मुंबईतही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या हस्ते जा मुंबईतील मनसेच्या चार नव्या शाखांचे उद्घाटन होणार आहे. दोन आठवड्यापूर्वीही राज यांच्या हस्ते मुंबईतील काही शाखांचे उद्घाटन करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा नव्या शाखांचे उद्घाटन होत आहे. कांदिवली, बोरिवली परिसरातील या सर्व शाखा आहेत.
संबंधित बातम्या:
Video : शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींना जोरदार टोला, तर फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर
ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?