अभिजित पोते, पुणे | 7 डिसेंबर 2023 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल होती. या निवडणुकीनंतर आता सरळ लोकसभेची निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत ही निवडणूक होणार असल्यामुळे राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजप, काँग्रेसकडून तयारी सुरु असताना छोट्या राजकीय पक्षांनीही तयारी चालवली आहे. पुणे तेथे काय उणे म्हटले जाते. त्याप्रमाणे पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एक पाऊल पुढे आहे. पुणे शहरात सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते भावी खासदार म्हणून आपआपल्या नेत्यांचे बॅनर्स लावत आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे मोहन जोशी यांचे बॅनर लागल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यात “पुण्याची पसंत मोरे वसंत” असे लिहिले असून भावी खासदार म्हटले गेले आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांचे फ्लेक्स पाहायला मिळत आहे. आता मनसेचे नेते वसंत मोरे यांचे पुण्याचे भावी खासदार असे फ्लेक्स शहरात उभारण्यात आले आहेत. पुणे शहर लोकसभेसाठी सक्षम नेतृत्व कार्यसम्राट नगरसेवक वसंत मोरे असा मजकूर या फ्लेक्सवर लिहिण्यात आला आहे. मनसेच्या कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांनी या फ्लेक्स वर “पुण्याची पसंत मोरे वसंत” असे देखील लिहिले आहे. याआधी सुद्धा अनेक वेळा वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे आगामी लोकसभा लढविण्यासाठी मोरे यांचे तिकीट फिक्स केलंय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाच राज्यांतील निवडणुकीपैकी तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी पुण्यातील काँग्रेस नेते मोहन जोशी यांचे योगदान होते. यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना भावी खासदार करुन टाकले. यासंदर्भात शहरात बॅनर्स दोन दिवसांपूर्वीच लावण्यात आले होते. पुणे युवक काँग्रेसकडून मोहन जोशी यांचे बॅनर्स लावले होते. त्या बॅनर्समध्ये त्यांना भावी खासदार म्हटले होते.